४२ उमेदवारांची अनामत जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:05 AM2019-05-24T01:05:53+5:302019-05-24T01:06:44+5:30
विजयासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना आपली अनामतही वाचविता आलेली नाही. नागपूर लोकसभेत २८ उमेदवारांची तर रामटेकमध्ये १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विजयासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना आपली अनामतही वाचविता आलेली नाही. नागपूर लोकसभेत २८ उमेदवारांची तर रामटेकमध्ये १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
नागपुरात ३० उमेदवार रिंगणात होते. भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांना पराभूत केले. काँग्रेसचे उमेदवार वगळता रिंगणातील उर्वरित २८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. बसपाचे मोहम्मद जमाल व बहुजन वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांनाही आपली अनामत राखता आली नाही. कही अपक्ष उमेदवारांना तर अत्यल्प मते मिळाली आहेत. अनेकांना पाचशेचाही टप्पा गाठता आला नाही.
रामटेकमुळे शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी पुन्हा गड राखला. काँग्रेसचे किशोर गजभिये यांना पराभवाला सामोरे जावे लागले. येथे गजभिये वगळता उर्वरित १४ उमेदवारांची अनामत जप्त झाली. बसपाचे सुभाष गजभिये व वंचित बहुजन आघाडीच्या किरण रोडगे -पाटणकर यांनाही अनामत वाचविता आली नाही.
अशी होते अनामत जप्त
आयोगाच्या नियमानुसार एकूण वैध मतांपैक १/६ ( सरासरी ) हजार मते घेणाऱ्या पराभूत उमेदवारांना त्यांची अनामत रक्क म परत दिली जाते. हा टप्पा पार न करणाऱ्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते. या नियमाचा आधार घेतला तर पराभूत उमेदवारांपैकी काँग्रेसचे नाना पटोले वगळता सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. ज्या प्रमाणात अपक्ष रिंगणात होते त्यांची संख्या लक्षात घेतली तर मोठ्या प्रमाणात मत विभाजन होईल व त्याचा फटक प्रमुख पक्षांना बसेल असा अंदाज होता. मात्र या उमेदवारांना मिळालेली मते पाहता तसे झाले नसल्याचे स्पष्ट होते. उलट उमेदवारांची संख्या वाढल्याने निवडणूक यंत्रणेच्या कामात वाढ झाली. मतमोजणीच्या विलंबासाठी हे देखील एक कारण आहे.