शादी डॉट काॅमवरील संपर्कामुळे ४.२२ लाखाचा चुना ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:20+5:302021-09-06T04:11:20+5:30
नागपूर : विवाहासाठी असलेल्या शादी डॉट कॉमवर लग्नाचे आमिष दाखवून अभियंता युवतीची ४.२२ लाखाने फसवणूक केल्याची घटना कपिलनगर ठाण्यांतर्गत ...
नागपूर : विवाहासाठी असलेल्या शादी डॉट कॉमवर लग्नाचे आमिष दाखवून अभियंता युवतीची ४.२२ लाखाने फसवणूक केल्याची घटना कपिलनगर ठाण्यांतर्गत घडली आहे. कपिलनगर पोलिसांनी कथित विजय अभय खरे (३१) तसेच त्याच्या महिला साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात दिल्लीत सक्रिय असलेल्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा हात असल्याची पोलिसांना शंका आहे. युवतीची रक्कम तर गेलीच तिचे विदेशात लग्न करण्याचे स्वप्नही भंगले.
पीडित युवती पुण्यातील एका प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत होती. आई आजारी असल्यामुळे ती नागपुरात आली. तिने लग्नासाठी शादी डॉट कॉमवर बायोडाटा दिला होता. ६ ऑगस्टला तिला कथित विजय खरेने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर दोघात बातचीत सुरू झाली. विजयने आपण आर्किटेक्ट असल्याची बतावणी केली. आपण मूळचा पुण्यातील असून युकेमध्ये कुटुंबासह स्थायिक झाल्याचे सांगितले. त्याने अभियंता असलेल्या युवतीशी लग्नाची इच्छा जाहीर केली. तिला भेटण्यासाठी तो भारतात येत असल्याचे सांगितले. दरम्यान, त्याला युवती संपन्न कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली. ३० ऑगस्टला विजयने आपण दिल्लीला पोहोचल्याची माहिती तिला दिली. त्याने आपल्या जवळ विदेशी मुद्रा असून त्याची भारतातील किंमत दोन कोटी रुपये असल्याचे सांगितले. आपल्याला विमानतळावर कस्टम विभागाने कस्टम ड्युटीसाठी थांबविल्याची माहिती त्याने दिली. कस्टम ड्युटी भरल्यानंतर आपल्याला विदेशी मुद्रासोबत सोडण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले. कस्टम ड्युटी भरण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्याचा आग्रह त्याने केला. विदेशी मुद्रा भारतीय मुद्रेत बदलल्यानंतर पैसे परत करणार असल्याचे आश्वासन त्याने दिले. युवतीला विश्वास वाटण्यासाठी त्याने एका कथित कस्टम महिला अधिकाऱ्याशी तिचे बोलणे करून दिले. त्या महिलेने कस्टम ड्युटी भरल्यानंतर विदेशी मुद्रा मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती दिली. अभियंता युवतीने ३८ हजार रुपये गुगल पे द्वारे ट्रान्सफर केले. त्यानंतर वेगवेगळे कारणे सांगितल्यामुळे युवतीने ४.२२ लाख रुपये इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून त्याला पाठविले. त्यानंतरही त्याने पैसे मागितल्यामुळे युवतीला संशय आला. युवतीला संशय आल्याचे पाहून विजय खरे याने तिच्याशी संपर्क तोडला. युवतीने त्वरित सायबर सेल तसेच कपिलनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. कपिलनगर पोलिसांनी फसवणूक तसेच आयटी ॲक्टनुसार गु्न्हा दाखल केला आहे. अभियंता युवतीने ट्रान्सफर केलेली रक्कम दिल्लीच्या एका खासगी बँकेत जमा झाली आहे. या प्रकरणात दिल्लीतील सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा हात असल्याची पोलिसांना शंका आहे. इंटरनेट कॉलवरून संपर्क साधून युकेवरून बोलत असल्याचे आरोपींनी सांगितले. तपास उपनिरीक्षक दिलीप रहाटे करीत आहेत.
............