४२८ दुचाकी जप्त

By admin | Published: July 14, 2017 02:41 AM2017-07-14T02:41:58+5:302017-07-14T02:41:58+5:30

हेल्मेटविषयी जनजागृती व हेल्मेट विकत घेण्यास वेळ देण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाने सक्तीची कारवाई शिथिल केली होती.

428 bicycle seized | ४२८ दुचाकी जप्त

४२८ दुचाकी जप्त

Next

१३१५ वाहनांवर कारवाई : हेल्मेट विशेष कारवाई मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हेल्मेटविषयी जनजागृती व हेल्मेट विकत घेण्यास वेळ देण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाने सक्तीची कारवाई शिथिल केली होती. दरम्यानच्या काळात शहरात सुरू झालेल्या ‘ई-चालान’ प्रणालीमुळे दुचाकीचालक हेल्मेट घालायलाही लागले, परंतु त्याचे प्रमाण कमी होते. याला गंभीरतेने घेत बुधवारपासून हेल्मेट कारवाईची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. गुरुवारी ४२८ दुचाकी जप्त करण्यात आल्या तर १३१५ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली.
वाहतूक पोलिसांनी गुरुवारी नेहमीचे चौक सोडून इतर चौकात दुचाकीस्वारांना अडवून तपासणी सुरू केली. यामुळे पळापळ, विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचे प्रकार घडले. यातही वाहतूक शाखा, चेंबर २ ला (सिव्हिल लाईन्स कार्यालय) सर्वाधिक ४०७ दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात यश आले. या शाखेने १७३ वाहने जप्त केली. चेंबर १ अंतर्गत २०६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली तर २७ वाहने जप्त केली. चेंबर ३ अंतर्गत २८० वाहनांवर कारवाई करून २१७ वाहने जप्त केली. चेंबर ४ अंतर्गत २७७ वाहनांवर कारवाई व ५ वाहने जप्त केली तर, चेंबर ५ अंतर्गत १४५ वाहनांवर कारवाई करीत ६ वाहने जप्त केली. पहिल्या दिवशी बुधवारी ८०० वाहनांवर कारवाई व ४६४ वाहने जप्त करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त (वाहतूक) रवींद्र परदेशी यांनी हेल्मेट घालूनच वाहन चालविण्याचे व वाहनाचे आवश्यक कागदपत्र जवळ बाळगण्याचे आवाहन केले आहे.

महिलेने घातला गोंधळ
पंचशील चौकात वाहतूक पोलिसांनी दुपारी १२.३० वाजता एका महिलेवर हेल्मेटची कारवाई करताच तिने गोंधळ घातला. चालान घेण्यास तिने नकार देत पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. अखेर वाहतूक पोलिसांना धंतोली पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिसांनी तिला समज दिल्यावर महिला शांत झाली. परंतु या घटनेने काही वेळासाठी खळबळ उडाली होती.

हेल्मेट घाला,
तुमचा जीव अमूल्य आहे
कारवाईच्या भीतीने नाही तर आपल्या आणि आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घाला, असे भावनिक आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दुचाकीचालकांना केले आहे. दुचाकीच्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे अनेकांचा जीव जातो. ज्यांचा जीव गेला त्याच्या परिवारातील सदस्याचे न भरून निघणारे आयुष्यभराचे नुकसान होते. कुटुंबातील आधार हरविल्यामुळे त्या कुटुंबाची वाताहत होते. त्यामुळे स्वत:च्या जीवाची पर्वा करा, आपल्यासोबतच आपल्या परिवारातील सदस्यांच्या जीवाची काळजी घ्या आणि दुचाकी चालविताना हेल्मेट घाला. हेल्मेट केवळ पोलीस कारवाई करतात म्हणून घालू नका. तर त्यामुळे तुमचा जीव आणि परिवाराचे भविष्य सुरक्षित राहील, जी भावना मनात ठेवून हेल्मेट घाला, असेही पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.

Web Title: 428 bicycle seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.