नागपुरात पाच वर्षात आगीसह दुर्घटनात ४२८ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:23 PM2018-04-12T21:23:39+5:302018-04-12T21:23:56+5:30
अग्निशमन विभागाला मागील पाच वर्षात तीन हजारांवर इमरजन्सी कॉल्स प्राप्त झाले. यात शहरात आगी, विहीर व तलावातील दुर्घटनांचा समावेश असून ४२८ लोकांचे बळी गेले. मृतात १०४ महिला ३२४ पुरुषांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अग्निशमन विभागाला मागील पाच वर्षात तीन हजारांवर इमरजन्सी कॉल्स प्राप्त झाले. यात शहरात आगी, विहीर व तलावातील दुर्घटनांचा समावेश असून ४२८ लोकांचे बळी गेले. मृतात १०४ महिला ३२४ पुरुषांचा समावेश आहे.
गेल्या वर्षभरात नागपूर शहरात लहानमोठ्या १३६० तर शहराबाहेर ४४ आगीच्या घटना घडल्या. शहरातील आगीच्या घटनात १८ कोटी ५७ लाख ३५ हजारांचे नुकसान झाले. तर ग्रामीण भागातील आगीच्या घटनात २२ कोटी ६७ लाख २१ हजार १५० रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांना शहर व ग्र्रामीण भागात आगीपासून १४६ कोटी ९४ लाखांची मालमत्ता आगीपासून वाचविण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
१४ एप्रिलला अग्निशमन सेवा दिवसाला देशभरात अग्निशमन विभागातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. यानिमित्ताने महापालिका मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सप्ताह पाळला जाणार आहे. असल्याची माहिती उचके यांनी दिली.
३१७३ दूषित विहिरींचा उपसा
अग्निशमन विभागाच्या जवानांना गेल्या वर्षभरात शहरातील ३१७३ दूषित पाणी असलेल्या विहिरींचा उपसा केला. यात महापालिकेला प्राप्त झालेल्या अर्जानुसार २९७७ तर शुल्क आकारून १९६ विहिरीतील पाण्याचा उपसा करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
जीएसटी व नोटाबंदीचा फटका
नोटाबंदी व जीएसटीमुळे अग्निशमन विभागाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. ४ ते ५ कोटींचे उत्पन्न गेल्या वर्षात १.७४ कोटींवर आले आहे. इमारतीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, खासगी विहिरींची सफाई, पाणीपुरवठा अशा माध्यमातून विभागाला उत्पन्न प्राप्त होते.
आठ स्टेशन अन् १५६ कर्मचारी
महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या मुख्यालयासह आठ स्टेशन कार्यरत आहेत. परंतु विभागात विविध पदावर १५६ कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. विभागात २१ फायर टेंडर, २ वॉटर टेंडर, ४२ मीटर उंच टर्न टेबल लॅडर, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, फोम टेंडर, इमरजन्सी टेंडर, यासह विविध वाहनांचा ताफा विभागाकडे आहे. मात्र मनुष्यबळाची कमतरता असल्याने विभागाला अडचणींचा सामना करावा लागतो.
जनजागृती व मॉक ड्रील
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे अग्निसुरक्षा अभियानांतर्गत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत ८१ उपक्रम राबविण्यात आले. यात शाळा, महाविद्यालय, रुग्णालय इमारती, शासकीय व निमशासकीय इमारती आदी ठिकाणी जनजागृती व मॉक ड्रील करण्यात आली. प्रशिक्षणात २१ हजार ११२ नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पाच वर्षांत ४,५९८ घटना
गेल्या पाच वर्षांत शहर व ग्रामीण भागात ४,५९८ आगीच्या घटना घडल्या. यात २०१३-१४ या वर्षात ७१४, २०१४-१५ या वर्षात ८३४, २०१५-१६ या वर्षात ९२२, २०१६-१७ या वर्षात ११२४ तर २०१७-१८ या वर्षात १३६० आगीच्या घटना घडल्याची माहिती राजेंद्र उचके यांनी दिली.