झाेपडपट्ट्यांतील ४३ टक्के घरांमध्ये चुलीवरच स्वयंपाक; महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2022 01:31 PM2022-07-01T13:31:28+5:302022-07-01T13:31:48+5:30
मुंबईची ‘वाॅरियर माॅम्स’ आणि स्थानिक ‘सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (सीएफएसडी) यांनी संयुक्तपणे नागपूरच्या ६ मतदारसंघातील १२ झाेपडपट्ट्यांमध्ये १५०० घरांमध्ये भेटी देऊन हे सर्वेक्षण केले.
नागपूर : भारतात हाेणाऱ्या एकूण हवा प्रदूषणात ३० ते ५० टक्के प्रमाण घरातून हाेणाऱ्या वायूप्रदूषणाचेही आहे. लाकडाच्या इंधनाचा वापर आजही माेठ्या प्रमाणात हाेते. चुलीचा वापर केवळ ग्रामीण भागात हाेताे, असे नाही तर शहरातही लाकडाची चूल पेटविली जात आहे. नागपूर शहरात झाेपडपट्ट्यांमधील ४३ टक्के घरात स्वयंपाक व इतर कामे चुलीवरच हाेत असल्याचे वास्तव आहे. यातील ९७ टक्के महिलांना तर ‘पंतप्रधान उज्ज्वला याेजना’ची माहितीच नाही. महागडे एलपीजी सिलिंडर घेणे शक्य नसल्याने लाकडाशिवाय पर्याय नाही आणि अर्थातच या धुराचे गंभीर परिणाम महिलांच्या आराेग्यावर हाेत आहेत.
मुंबईची ‘वाॅरियर माॅम्स’ आणि स्थानिक ‘सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (सीएफएसडी) यांनी संयुक्तपणे नागपूरच्या ६ मतदारसंघातील १२ झाेपडपट्ट्यांमध्ये १५०० घरांमध्ये भेटी देऊन हे सर्वेक्षण केले. ‘महिलांचे आराेग्य हे स्वच्छ हवेचे निर्देशक’ या संकल्पनेत हे सर्वेक्षण झाले. गुरुवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते या सर्वे बुकचे लाेकार्पण झाले. यावेळी सीएफएसडीच्या लीना बुद्धे, तज्ज्ञ डाॅ. समीर अरबट व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जाेगदंड उपस्थित हाेते. मनपा आयुक्तांनी काेणतेही धाेरण ठरविण्यासाठी अशाप्रकारे ग्राउंड स्तरावर अभ्यास व ॲनालिसिस आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
सर्वेक्षणातील मुद्दे
- सीएफएसडीच्या लीना बुद्धे यांनी सर्वेक्षणातील गंभीर वास्तव यावेळी सांगितले.
- ८३ टक्क्यांमध्ये ७० टक्के कुटुंब हे ओबीसी व एससी समाजातील आहेत.
- या कुटुंबांची मासिक मिळकत ७००० ते १०,००० दरम्यान आहेत. अत्यल्प कुटुंबाची मिळकत १०,००० रुपयांवर आहे.
- ७ टक्के घरात केवळ चुलीचा उपयाेग हाेताे.
- चुलीचा उपयाेग करणाऱ्या ९३ टक्क्यांकडे एलपीजी कनेक्शन आहे. पण, ते महागडे सिलिंडर घेऊ शकत नाही.
- आठवड्यात एक दिवस चार-पाच तास महिलांना लाकडे व सरपण गाेळा करावे लागतात.
- शहरालगतच्या चिखली, सिद्धेश्वरीनगर अशा झाेपडपट्टीत १०० टक्के चुलीचा वापर होतो.
८१ टक्के महिलांना आराेग्याची गंभीर लक्षणे
- चुलीसमाेर काम करणाऱ्या ८१ टक्के महिलांना खाेकल्याचा त्रास आहे. म्हणजे यकृतासंबंधी समस्या आहेत. ६५ टक्के महिलांना डाेळ्यासंबंधी गंभीर त्रास आहेत.
- डाॅ. समीर अरबट यांनी धूम्रपान करणाऱ्यांना हाेणारे सीओपीडी हा आजार या महिलांना असण्याकडे लक्ष वेधले. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या गराेदर महिला व त्यांच्या मुलांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागताे.