नागपुरातील 43 टक्के उमेदवार दारिद्र्य रेषेखालील...!
By योगेश पांडे | Published: April 1, 2024 10:58 AM2024-04-01T10:58:25+5:302024-04-01T10:59:36+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: देशातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये कोट्यधीश उमेदवारांचीच भाऊगर्दी दिसून येते. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत आहे. मतदारसंघातून सद्यस्थितीत २६ उमेदवार रिंगणात आहेत.
- योगेश पांडे
नागपूर - देशातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये कोट्यधीश उमेदवारांचीच भाऊगर्दी दिसून येते. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत आहे. मतदारसंघातून सद्यस्थितीत २६ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी केवळ २७ टक्के उमेदवार कोट्यधीश असून, ४३ टक्के उमेदवार बीपीएल गटातील आहेत.
‘लोकमत’ने सर्व उमेदवारांच्या शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. सर्वच पक्ष व अपक्ष मिळून नागपूर मतदारसंघात एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण उमेदवारांच्या संख्येच्या तुलनेत उत्पन्नाची टक्केवारी काढली असता ७ म्हणजेच २७ टक्के उमेदवारांची संपत्ती कोटींमध्ये आहे. उमेदवार तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्ता विचारात घेऊन एकूण मालमत्ता दर्शविण्यात येते, हे विशेष. २०१९च्या निवडणुकीत हाच आकडा १५ टक्के इतका होता. सर्वाधिक कोट्यधीश नोंदणीकृत पक्षांमध्ये असून, तीन अपक्ष कोट्यधीश आहेत. तीन उमेदवारांच्या नावावर कुठलीही मालमत्ता नसल्याचे नमूद आहे.
२६ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न शून्य
- तब्बल ४३ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख किंवा त्याहून कमी आहे. त्यातील सात उमेदवारांनी तर त्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न शून्य असल्याचे दर्शविले आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न शून्य रुपये आहे तर मग त्यांचा चरितार्थ चालतो तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- नागपूर मतदारसंघातून ११ अपक्ष रिंगणात आहेत. यातील तीन अपक्ष उमेदवार कोट्यधीश आहेत.
उमेदवारांची एकूण मालमत्ता
मालमत्ता उमेदवारांची संख्या
१ लाखाहून कमी ६
१ लाख ते १० लाख २
१० लाख ते २५ लाख ३
२५ लाख ते ५० लाख ३
५० लाख ते १ कोटी ५
एक कोटीहून अधिक ५
दहा कोटींहून अधिक २
उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न
वार्षिक उत्पन्न उमेदवारांची संख्या
शून्य ७
एक लाखांहून कमी ४
१ लाख ते ५ लाख ६
५ लाख ते १० लाख ४
१० लाख ते २५ लाख ३
२५ लाख ते ५० लाख ०
५० लाखांहून अधिक २
२३ टक्के उमेदवारांची मालमत्ता एक लाखांहून कमी
नागपूर मतदारसंघातील २३ टक्के उमेदवारांची एकूण मालमत्ता १ लाखांहून कमी आहे. तर ७.७० टक्के उमेदवारांची मालमत्ता १ लाख ते १० लाख यांच्या दरम्यान आहे. ११.५४ टक्के उमेदवारांकडील एकूण मालमत्ता १० लाख ते २५ लाख यांच्या दरम्यान आहे.