घड्याळ चोरीचा ४३ वर्षे जुना खटला निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:32 AM2019-03-18T11:32:03+5:302019-03-18T11:33:23+5:30

राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये रविवारी घड्याळ चोरीचा ४३ वर्षे जुना खटला फिर्यादी विजय साहू यांच्या सामंजस्यामुळे निकाली निघाला. साहू यांनी या प्रकरणातील तक्रार मागे घेतली.

The 43 year old case of Theft sort out | घड्याळ चोरीचा ४३ वर्षे जुना खटला निकाली

घड्याळ चोरीचा ४३ वर्षे जुना खटला निकाली

Next
ठळक मुद्देलोक न्यायालयएकूण २ हजार ७२५ प्रलंबित प्रकरणे संपली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये रविवारी घड्याळ चोरीचा ४३ वर्षे जुना खटला फिर्यादी विजय साहू यांच्या सामंजस्यामुळे निकाली निघाला. साहू यांनी या प्रकरणातील तक्रार मागे घेतली.
साहू हे एम्प्लॉयमेंट कार्ड काढण्यासाठी संबंधित कार्यालयात गेले असताना रमेश नावाच्या आरोपीने त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपीने तो साहू यांच्या वडिलांचा साळा असल्याची खोटी माहिती दिली. दरम्यान, आरोपीने साहू यांची घड्याळ चोरली. याचा खटला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी बी. डी. तारे यांच्या न्यायालयात प्रलंबित होता. हा खटला तडजोडीसाठी न्याय दंडाधिकारी शहजाद परवेझ यांच्या पॅनलसमक्ष ठेवण्यात आला होता. त्यानंतर साहू यांनी फिर्याद मागे घेऊन खटला संपवला. राष्ट्रीय लोक न्यायालयात या प्रकरणासह जिल्ह्यातील एकूण २ हजार ७२५ प्रकरणे सामंजस्याने संपविण्यात आली. त्यात १ हजार २१८ दिवाणी, फौजदारी व भूसंपादन वादाची प्रकरणे, ६०० मोटार वाहन कायदा प्रकरणे तर, ९०७ वादपूर्व प्रकरणांचा समावेश आहे.
मोटार अपघात दावा न्यायाधिकरणचे न्यायाधीश एस. डी. दरणे यांच्या न्यायालयातील दोन प्रकरणे सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश वाय. बी. येणुरकर यांच्या पॅनलसमक्ष निकाली निघाली. एका प्रकरणात दावेदार कविता बजाज यांना टाटा एआयजी इन्शुरन्सकडून ३२ लाख तर, अनिता बडे यांना फ्युचर जनरल इन्शुरन्सकडून ३० लाख रुपये भरपाई मिळाली. धनादेश अनादराची ४२० प्रकरणे निकाली निघाली. एका प्रकरणात श्रीराम चिटस् कंपनीला विनोद खुराणा यांच्याकडून ९ लाख ५६ हजार ६२७ रुपये मिळाले. प्रकरणे ऐकण्यासाठी ६२ पॅनल्स तयार करण्यात आले होते. प्रत्येक पॅनलमध्ये एक न्यायाधीश, एक वकील व एक समाजसेवकाचा समावेश होता. उच्च न्यायालयातील प्रकरणे हाताळण्यासाठी न्या. रोहित देव, न्या. मनीष पितळे व सेवानिवृत्त न्या. एस. आर. डोणगावकर यांचे पॅनल्स तयार करण्यात आले होते. प्रभारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे, न्या. व्ही. बी. कुळकर्णी, न्या. धनराज काळे आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
वडिलाच्या मृत्यूनंतर मुलाचा पुढाकार
फिर्यादी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलाने तडजोडीसाठी पुढाकार घेतल्यामुळे ३८ वर्षे जुने विश्वासघाताचे प्रकरण निकाली निघाले. यातील पांडुरंग नावाच्या आरोपीने फिर्यादीकडून किरायाने घेतलेली सायकल परस्पर विकली होती. यासंदर्भातील खटला आतापर्यंत प्रलंबित होता.

Web Title: The 43 year old case of Theft sort out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.