नागपूर जिल्ह्यातील उद्योगात ४३ हजार कामगार रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 11:51 PM2020-06-08T23:51:29+5:302020-06-08T23:53:00+5:30
लॉकडाऊनच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ हजार ७०२ उद्योग घटकांना उत्पादन सुरू करण्यासाठी ऑनलाईन परवानगी देण्यात आली आहे. यापैकी ८० टक्के म्हणजेच २ हजार १७९ उद्योग घटकात प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे परवानगीप्राप्त उद्योगात ४३ हजार कामगार रुजूदेखील झाले आहेत, अशी माहिती उद्योग सहसंचालकांकडून सोमवारी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ हजार ७०२ उद्योग घटकांना उत्पादन सुरू करण्यासाठी ऑनलाईन परवानगी देण्यात आली आहे. यापैकी ८० टक्के म्हणजेच २ हजार १७९ उद्योग घटकात प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे परवानगीप्राप्त उद्योगात ४३ हजार कामगार रुजूदेखील झाले आहेत, अशी माहिती उद्योग सहसंचालकांकडून सोमवारी देण्यात आली.
विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी कोरोनाविषयक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उद्योग सहसंचालक अ. प्र. धर्माधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाविषयी नागपूर शहराचादेखील आढावा घेण्यात आला.
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक असून यासाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करण्यात यावी, शिवाय मेयो व मेडिकलमध्ये ‘प्लाझ्मा बँक’ तयार करण्यात यावी. शहरात घनकचºयाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे. गर्दीची शक्यता लक्षात घेता आठवडी बाजार व बाजारपेठांबाबत अधिक दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना नितीन राऊत यांनी दिल्या. तुकाराम मुंढे यांनी विलगीकरण कक्ष, निवारागृह, अन्नवाटप, अत्यावश्यक सेवा उपलब्धतेसंदर्भात केलेल्या उपाययोजना, जंतूनाशक फवारणी, कोविड केअर सेंटर, पॉझिटिव्ह- निगेटिव्ह रुग्ण तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती सादर केली.
मुंबई-पुण्यातील सुमारे दोन हजार लोक ग्रामीणमध्ये
नागपूर ग्रामीण क्षेत्रात आतापर्यंत १२ हजार ६०९ नागरिक आले असून, यात मुंबई-पुण्यातील १ हजार ९६२ जणांचा समावेश आहे. इतर ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत असून, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.