नागपूर विमानतळावर ४४ लाखांचे तस्करीचे सोने जप्त; महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई
By मोरेश्वर मानापुरे | Published: August 19, 2023 06:20 PM2023-08-19T18:20:20+5:302023-08-19T18:20:50+5:30
नागपूर विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ
नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नागपूर विमानतळावर एका तस्कराला अटक करून त्याच्याकडून जवळपास ४४ लाख रुपये किमतीचे ७४३.५६ ग्रॅम सोने जप्त केले. डीआरआयने आरोपीचा पासपोर्ट जप्त केला आहे. डीआरआयने हे प्रकरण केंद्रीय सीमाशुल्क विभागाकडे चौकशीसाठी सोपविले आहे.
सचिन चांदोस्कर असे आरोपीचे नाव असून तो उल्हासनगर, ठाणे येथील रहिवासी आहे. तो शुक्रवारी पहाटे एअर अरेबियाच्या विमानाने शारजाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याने हे सोने पेस्ट स्वरूपात अंतर्वस्त्रात लपवून आणले होते. एअर अरेबियाच्या विमानातून सोन्याची तस्कर आल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली. अधिकाऱ्यांनी नागपूर विमानतळावर सापळा रचला.
अधिकाऱ्यांना एका प्रवाशाच्या चालण्याचे हावभाव संशयास्पद वाटले. डीआरआयने त्याला तात्काळ ताब्यात घेऊन झडती घेतली. झडतीदरम्यान त्याच्या अंडरवेअरमध्ये लपवलेले ७४३.५६ ग्रॅम सोने सापडले. ते सोने पेस्ट स्वरूपात होते. त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासल्यानंतर तो दुबईहून अनेकवेळा भारतात आल्याचे आढळून आले. तो शारजाहून प्रथमच नागपुरात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नागपूर विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी सीमाशुल्क विभागाने एका सोन्याच्या तस्कराला अटक केली होती.