नागपूर विद्यापीठाला ४४ लाखांचा गंडा, महिला रोखपालाविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: August 30, 2024 11:19 PM2024-08-30T23:19:47+5:302024-08-30T23:19:54+5:30
सॉफ्टवेअरमध्ये ४३९ पावत्यांमध्ये केला बदल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एरवी काही ना काही कारणाने सातत्याने चर्चेत राहणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. एका महिला रोखपालाने विद्यापीठाला ४४ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. विद्यापीठाच्या सॉफ्टवेअरमध्ये तिने ४३९ पावत्या अवैध पद्धतीने अपडेट करत अपहार केला. या प्रकरणात अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बबिता नितीन मसराम (४०, एसआरपीएफ क्वॉर्टर्स, हिंगणा) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती विद्यापीठात कनिष्ठ लिपिक पदावर असून, कॅश काऊंटरवर रोखपाल म्हणून कार्य करते. विद्यापीठात कॅश काऊंटरवरील रोखपाल एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काम करतात. त्यांना युझर आयडी व पासवर्डदेखील देण्यात आला आहे. जर एखादी नोंद चुकली, तर त्याच दिवशी त्यात बदल करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. जर चूक नंतर समोर आली, तर अधिकारी पावती मॉडिफाय करू शकतात. २०२३ मधील एका पावतीमुळे हा भ्रष्टाचार समोर आला. एम. के. बिल्डरने विद्यापीठाच्या अभियंता विभागाच्या मार्फत ३४,१६० रुपयांची पावती सुरक्षा ठेवीच्या रिफंडसाठी जमा केली. वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता, मूळ पावती केवळ ४,१६० रुपयांची होती. त्यात बबिता मसरामच्या लॉगिन आयडीवरून २०२२ मध्येच मॉडिफिकेशन झाले होते. याबाबत विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांनी मसरामला विचारणा केली असता तिने चुकीने मॉडिफिकेशन झाल्याचा दावा केला व ३० हजार रुपये विद्यापीठाच्या खात्यात भरले. मात्र, पालीवाल यांना संशय आला व त्यांनी तिच्या युझर आयडीवरून दिलेल्या पावत्यांची तपासणी केली. त्यात ४३९ तिने मॉडिफाय करत विद्यापीठाला तब्बल ४४ लाख ४० हजारांचा गंडा घातल्याची बाब समोर आली. विद्यापीठाने याची आणखी सखोल चौकशी केली. पालीवाल यांच्या तक्रारीवरून मसरामविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१९ पासून सुरू होता प्रकार
बबिता मसरामकडून हा प्रकार २०१९ पासून सुरू होता. २०१९ ते २०२३ या कालावधीत मसरामने ४३९ पावत्या मॉडिफाय करत अपहार केला. मसरामसोबत इतर कुणी कर्मचारी किंवा अधिकारी यात सहभागी आहेत का याची चौकशी सुरू आहे. मसरामने इतक्या मोठ्या प्रमाणात पावत्या मॉडिफाय केल्यावरदेखील कुणालाही संशय कसा काय आला नाही की, यामागे नियोजनबद्ध पद्धतीने केलेला भ्रष्टाचार आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.