मुर्ती स्थापनेला ४४ वर्षे : साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू
By नरेश डोंगरे | Published: November 30, 2023 08:59 PM2023-11-30T20:59:39+5:302023-11-30T20:59:52+5:30
वर्धा मार्गावरील साईमंदीरात रविवारी विविध कार्यक्रम
नागपूर: वर्धा मार्गावरील श्री साईबाबा मंदीरात बाबांच्या मुर्ती स्थापनेला रविवारी ४४ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने रविवारी ३ डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी बाबांना ४४ किलो बुंदीचा लाडूसुद्धा अर्पण केला जाणार आहे.
प्रति शिर्डी म्हणून वर्धा मार्गावरील साईबाबांच्या मंदीराकडे बघितले जाते. येथील मंदीरात दर्शन घेताना शिर्डीच्या साई मंदीरात दर्शन घेतल्याचा आनंद मिळतो, अशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे सकाळ- सायंकाळची आरती आणि दिवसभरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. गुरुवारी तर भक्तांची रात्री ११ पर्यंत प्रचंड गर्दी असते. या मंदीरात बाबांची मुर्ती स्थापन करण्याला ३ डिसेंबरला ४४ वर्षे पूर्ण झाली आहे.
त्यानिमित्ताने श्री साईबाबा सेवा मंडळाने रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सायंकाळी ६.३० वाजता पूजा अर्चना झाल्यानंतर बाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू अर्पण केला जाणार आहे. त्यानंतर भाविकांना प्रसाद वितरीत केला जाणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून बाबांच्या कृपा प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साईबाबा सेवा मंडळाचे सचिव अविनाश शेगावकर यांनी केले आहे.