४४० डॉक्टर निलंबित
By admin | Published: March 23, 2017 02:01 AM2017-03-23T02:01:36+5:302017-03-23T02:01:36+5:30
सुरक्षेच्या मुद्याला घेऊन सोमवारपासून सामूहिक रजेवर गेलेल्या ४४० निवासी डॉक्टरांवर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
मेयो, मेडिकलची रुग्णसेवा आॅक्सिजनवर : सामान्य नागरिकांना फटका
नागपूर : सुरक्षेच्या मुद्याला घेऊन सोमवारपासून सामूहिक रजेवर गेलेल्या ४४० निवासी डॉक्टरांवर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) १३० तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ३१० निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. या कारवाईचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेने निषेध करीत दुपारपासून त्यांनीही संपात उडी घेतली. परिणामी, उपराजधानीची आरोग्य व्यवस्था प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गरीब रु ग्ण झाला रडवेला
मेयो, मेडिकलमधील निवासी डॉक्टर तिसऱ्या दिवशी, बुधवारी सामूहिक रजेवर होते. परिणामी, रुग्णांच्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या या दोन्ही रुग्णालयांमध्ये योग्य उपचार मिळत नसल्याने गरीब रु ग्ण रडवेला झाला आहे. उपचारासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. एका वरिष्ठ डॉक्टरांकडे तीन-तीन वॉर्डाची जबाबदारी आल्याने तारांबळ उडत आहे. वॉर्डात भरती रुग्णांवर अर्धवट उपचार करून सुटी दिली जात आहे.
केवळ ‘राऊंड’ पुरतेच वरिष्ठ डॉक्टर
निवासी डॉक्टर सोमवारपासून सामूहिक रजेवर गेल्याने यांची जबाबदारी वरिष्ठ डॉक्टरांवर आली आहे. परंतु या दोन्ही रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, आकस्मिक विभाग, अतिदक्षता विभाग सोडल्यास दुपारनंतर कुठेच वरिष्ठ डॉक्टर दिसून येत नसल्याचे चित्र आहे. रुग्णाच्या मते वरिष्ठ डॉक्टर दिवसातून केवळ दोन वेळा राऊंड घेतात. त्यानंतर वॉर्डात ‘इंटर्न’ व परिचारिकाच असतात. विशेष म्हणजे इतर दिवशी ३०० वर रुग्णांना भरती केले जात होते तो आकडा बुधवारी केवळ १०० वर आला आहे. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून आपत्कालीन स्थितीत येणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहे.
२४ तासांत १४ मृत्यू
मेडिकलमध्ये इतर दिवसांमध्ये २४ तासांत सात-आठ रुग्णांचा मृत्यू होतो. परंतु निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेल्यापासून म्हणजे सोमवार सकाळी ८ ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी
मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासमोर (ओपीडी) बुधवारी रुग्णांची लांबच लांब रांग लागली होती. निवासी डॉक्टर गैरहजर असल्याने वरिष्ठ डॉक्टर आपली सेवा देत होते. परंतु रुग्णांच्या संख्येत त्यांची तोकडी संख्या होती. परिणामी, उपचारात वेळ लागत असल्याने रुग्णांच्या गर्दीत भर पडत होती. विशेष म्हणजे, ‘ओपीडी’ व वॉर्डात मेडिकलच्या ‘नॉन क्लिनीकल’ डॉक्टरांची ड्युटी लावण्यात आलेल्या नाही. यामुळे रुग्णांचा भार कार्यरत डॉक्टरांवर वाढला असून गोंधळ उडत असल्याचे खुद्द डॉक्टरांचे म्हणणे आहे.