४४४ शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ
By admin | Published: January 1, 2016 04:27 AM2016-01-01T04:27:57+5:302016-01-01T04:27:57+5:30
नागपूर जिल्ह्यातील नागपूर, उमरेड, काटोल, हिंगणा, मौदा, कळमेश्वर, रामटेक, सावनेर, कुही, पारशिवनी, नरखेड या ११
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नागपूर, उमरेड, काटोल, हिंगणा, मौदा, कळमेश्वर, रामटेक, सावनेर, कुही, पारशिवनी, नरखेड या ११ तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकांराकडून घेतलेल्या कर्जास शासन निर्णयानुसार ४४४ शेतकऱ्यांच्या ९४ लाख २१ हजार ८१४ रकमेला कर्ज माफी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यांनी येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रतिनिधी डी.बी. गोतमारे, जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, जिल्हा विशेष लेखापरीक्षक प्रतिनिधी मिलिंद आटे, सहायक निबंधक टी.एन.चव्हाण, अशोक गिरी, सुखदेव कोल्हे, आर.एन. वसू, चैतन्य नासरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आतापर्यंत जिल्ह्यात ६२६९ शेतकऱ्यांचे कर्ज माफ
४नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत २८१ सावकारांकडून ६२६९ शेतकऱ्यांनी घेतलेले १० कोटी ८८ लाख ८७ हजार ४७९ रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. ज्या शेतकरी कर्जदारांचे कर्ज रक्कम समितीने मंजूर केली आहेत त्या कर्जदारांचे दागिने परत करण्यासाठी तालुका निबंधकांनी ५ जानेवारी २९१६ रोजी सावकाराची सभा घेऊन दागिने परत करण्यासाठी मोहीम राबवावी. तसेच परवानाधारक सावकारांनी गहाण वस्तू परत केलेल्या नाहीत, अशा सावकाराची माहिती जिल्हा समितीला कळवावी. ज्या कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजुरी झाल्याचे लेखी कळवावे. गहाण वस्तू परत करतांना कर्जदार शेतकरी हाच खरा शेतकरी आहे याची खात्री करावी. ज्या सावकारांनी कर्जदाराचे गहाण माल परत केले आहे, त्याचे प्रस्ताव उपनिबंधकांकडे सादर करावे. कोणतीही अपात्र व्यक्ती या योजनेचा लाभ घेणार नाही याची काळजी घेऊन मोहीम राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.
११ तालुक्यातील शेतकरी
४शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात तालुकानिहाय प्रकरणे अशी आहेत. नागपूर तालुका- २ सावकार, शेतकरी संख्या -३, कर्जमाफी रक्कम ४२ हजार १२ रुपये, उमरेड तालुका ११ सावकार, शेतकरी संख्या ६०, कर्जमाफी २९ लाख ८६ हजार ६६८ रुपये, काटोल तालुका १७ सावकार, शेतकरी संख्या ११०, कर्जमाफी १३ लाख ८९ हजार ३८८ रुपये, हिंगणा तालुका एक सावकार, शेतकरी संख्या ३, कर्जमाफी २१ हजार ३६६ रुपये, मौदा तालुका एक सावकार, शेतकरी संख्या १, कर्जमाफी ५ हजार ९४०, कळमेश्वर तालुका १२ सावकार, ९५ शेतकरी संख्या, कर्जमाफी १२ लाख ७९ हजार १७ रुपये, रामटेक तालुका ५ सावकार, शेतकरी संख्या ४६, कर्जमाफी ८ लाख ८५ हजार २६० रुपये, सावनेर तालुका ८ सावकार, ६० शेतकरी, १२ लाख ९४ हजार १२२ रुपये, नरखेड तालुका ४ सावकार, १५ शेतकरी संख्या, कर्जमाफी ३ लाख २८ हजार ४२३ रुपये, पारशिवनी तालुका ९ सावकार, शेतकरी संख्या ४२, कर्जमाफी ११ लाख १० हजार ६४६ रुपये, कुही तालुका ५ सावकार, शेतकरी संख्या ९, कर्जमाफी ८८ हजार १७२ रुपये अशा एकूण ७५ सावकारांकडून ४४४ शेतकऱ्यांनी घेतलेल्या ९४ लाख २१ हजार ८१४ रकमेला कर्जमाफी देण्यात आली आहे.