होम आयसोलेशनचे ४,४६८ रुग्ण कुणाच्या भरवशावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:26 AM2020-12-13T04:26:03+5:302020-12-13T04:26:03+5:30
नागपूर : कोरोनाची लक्षणे नसलेल्या किंवा अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोविड केअर सेंटर (सीसीसी) किंवा घरी स्वतंत्र सोय असल्यास ...
नागपूर : कोरोनाची लक्षणे नसलेल्या किंवा अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोविड केअर सेंटर (सीसीसी) किंवा घरी स्वतंत्र सोय असल्यास गृह विलगीकरण म्हणजे ‘होम आयसोलेशन’ करण्याचे निर्देश आहेत. परंतु सोय नसतानाही बहुसंख्य रुग्ण होम आयसोलेशनचा पर्याय निवडत आहेत. यातच कोविडबाबत आता बेफिकिरी वाढल्याने काही होम आयसोलेशनचे रुग्ण नियमांकडे विशेष लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणाही या रुग्णांप्रति गंभीर नसल्याचे चित्र आहे. यामुळे सद्यस्थितीत असलेले ४,४६८ रुग्ण नेमके कुणाच्या भरवशावर आहेत, हा प्रश्न आहे. परंतु प्रशासनाने आमचे लक्ष असल्याचा दावा केला आहे.
कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार वर्गीकृत केले जाते. लक्षणे नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणानुसार रुग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे दाखल केले जाते. परंतु दरम्यानच्या काळात अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांंना जर त्यांच्या घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असेल तर त्यांच्या संमतीनुसार होम आयसोलेशन केले जाते. सध्या याचे प्रमाण वाढले आहे. नागपूर जिल्ह्यात ५,५६२ रुग्ण पॉझिटिव्ह असून, केवळ १५०२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरीत रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.
-होम आयसोलेशनचे हे नियम पाळतात कोण!
होम आयसोलेशनचा रुग्णाला हवेशीर बंद खोलीत राहावे लागते. शक्यतो स्वतंत्र शौचालय असावे लागते. घरात फिरण्यावर बंधने असतात. घराबाहेर पडण्यावर प्रतिबंध असते. सर्जिकल मास्क वापरणे व दर सहा ते आठ तासाने बदलावे लागते. मास्कचे विघटन करण्यासाठी बीच सोल्यूशन (५ टक्के) अथवा सोडियम हयपोक्लोराईट (५ टक्के) वापरून मास्क डिसईनफेक्ट करावे लागते. घरी दिवस-रात्र काळजी घेणारी व्यक्ती असावी लागते. मोबाईलवरील आरोग्य सेतू अॅपवर अॅक्टिव्ह असावे लागते. या सर्व सोयी असल्यावरच व तसे रुग्णाने प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यावरच रुग्णाला होम आयसोलेशन केले जाते. परंतु रुग्ण हे सर्व नियम पाळतात का, हा प्रश्न आहे.
- ना तपासणी, ना औषधी
आरोग्य यंत्रणेकडून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची ना तपासणी केली जाते, ना औषधी दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्यानुसार पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर दोन दिवसात यंत्रणेचे कर्मचारी घरी येतात. केवळ कुटुंबाची माहिती घेऊन निघून जातात. विशेष म्हणजे, साधा ताप किंवा शरीरातील ऑक्सिजनची पातळीही मोजत नाही. औषधी मागूनही मिळत नाही.
जिल्ह्यातील एकूण रुग्ण-१,१६,९११
सध्या उपचार घेणारे रुग्ण-५,५६२
होम आयसोलेशनमधील रुग्ण-४,४६८
-रुग्णांचा पाठपुरावा व औषधोपचार दिला जातो
होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांचा आरोग्य यंत्रणेकडून पाठपुरावा केला जात आहे. सोबतच आवश्यकतेनुसार औषधोपचार दिला जात आहे. कुणा रुग्णाला काही समस्या असतील तर त्यांनी तक्रार करावी. त्याची गंभीर दखल घेण्यात येईल.
-डॉ. दीपक थेटे
प्रभारी, जिल्हा शल्यचिकित्सक