इन्कम टॅक्सची भीती दाखवून ४.४७ कोटींनी फसवणूक, आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 03:08 PM2023-05-24T15:08:03+5:302023-05-24T15:08:16+5:30

टाऊन प्लॅनिंगमधून निवृत्त उपसंचालकांची फसवणूक

4.47 crore cheated by showing fear of income tax, | इन्कम टॅक्सची भीती दाखवून ४.४७ कोटींनी फसवणूक, आरोपीस अटक

इन्कम टॅक्सची भीती दाखवून ४.४७ कोटींनी फसवणूक, आरोपीस अटक

googlenewsNext

 

नागपूर : इन्कम टॅक्सची भीती दाखवित मालमत्तेची माहिती घेऊन मालमत्ता खरेदी-विक्री दरम्यान ४.४७ कोटींनी फसवणूक करणाऱ्या आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

बाळकृष्ण बबनराव गव्हाणकर (रा. धंतोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर स्मिता मदन झिरे असे त्याच्या महिला साथीदाराचे नाव आहे. टाऊन प्लॅनिंग विभागातून उपसंचालक पदावरून निवृत्त झालेले हरिदास कोमलकर (वय ८०, रा. रजनीगंधा अपार्टमेंट, धंतोली) येथे राहतात. त्यांचा मुलगा मुंबईत राहतो. आरोपी बाळकृष्ण गव्हाणकर आणि स्मिता मदन झिरे यांनी संगनमत करून कोमलकर कुटुंबीयांसोबत ओळख वाढविली.

गव्हाणकर याने आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे काम करीत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्याच्यावर विश्वास ठेवून कोमलकर यांनी आपल्या व पत्नी देवयानी यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती आरोपी गव्हाणकर याला दिली. त्यानंतर आरोपीने त्यांना इन्कम टॅक्सची भीती दाखवून, त्यांच्या मालकीची शेती बाजूचा शेतमालक ताब्यात घेईल असे सांगून त्यांच्या मनात भीती निर्माण केली. गव्हाणकर आणि आरोपी स्मिता झिरे यांनी कोमलकर यांची दिशाभूल करून त्यांना काही मालमत्ता विक्री करण्यास भाग पाडले. त्यासाठी आरोपी स्वत: ग्राहकही आणत होता. कोमलकर हे कर्जबाजारी आहेत, असे दाखवून त्याने एफडीवर कर्जही काढायला लावले.

या सर्व व्यवहारातून मिळालेली रक्कम व कर्जाच्या रकमेपेकी मोठी रक्कम दोन्ही आरोपींनी आपल्याकडे ठेवून घेतली. यात आरोपी गव्हाणकरने यातील मोठी रक्कम स्वत:, बहीण, आई आणि त्याच्या गुरुदेव प्रॉपर्टीजच्या नावाने केली. तर स्मिता झिरे हिनेही काही रक्कम आपल्या खात्यात जमा केली. दोन्ही आरोपींनी कोमलकर यांची ४ कोटी ४७ लाख ४३ हजारांची रक्कम हडपली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कोमलकर यांनी धंतोली ठाण्यात तक्रार दिली. धंतोली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपी गव्हाणकर यास अटक केली असून त्याची साथीदार स्मिता झिरे हिचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

Web Title: 4.47 crore cheated by showing fear of income tax,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.