४५ लाखांची रोकड जप्त
By admin | Published: September 7, 2015 02:48 AM2015-09-07T02:48:00+5:302015-09-07T02:48:00+5:30
गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी दुपारी सदरमधील रेसिडेन्सी भागात तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४५ लाखांची रोकड जप्त केली.
नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी दुपारी सदरमधील रेसिडेन्सी भागात तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४५ लाखांची रोकड जप्त केली. ही रोकड हवालाचीच असावी, असा दाट संशय आहे. मात्र, ज्यांच्याकडून रक्कम जप्त करण्यात आली, त्यांना बोलते करण्यात पोलिसांना यश आले नाही. दरम्यान, या रकमेचा हिशेब समाधानकारक हिशेब न मिळाल्यामुळे पोलिसांनी आरोपी आणि या प्रकरणाचा तपास प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सोपवला.
ही रक्कम कुणाची?
नागपूर : सदरमधील रेसिडेन्सी मार्गावरच्या झाल कॉम्प्लेक्समध्ये हवालाचा व्यवहार सुरू असल्याची आणि येथे कोट्यवधींची रोकड असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर, रंजन शर्मा, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पीआय पी. एम. सानप यांच्या पथकाने झाल कॉम्प्लेक्सच्या पहिल्या माळ्यावरील एका कार्यालयात शनिवारी दुपारी २.३० वाजता छापा घातला. तेथे आरोपी नीलेश जैन, संतोष सनोडीया (दोघेही रा. नागपूर) आणि प्रशांत पोगालवार (रा. पांढरकवडा, यवतमाळ) यांच्याकडे नोटांचे बंडल आढळले. ही रोकड एकूण ४५ लाख,७४८० रुपये होते. ही रक्कम कुणाची, कशासाठी येथे आणली, कुणाला द्यायची आहे, याबाबत आरोपी कसलीही माहिती देऊ शकले नाही. त्यामुळे गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी प्राप्तिकर खात्याचे अन्वेषण अधिकारी रवी कुकडे अणि रवी कडू यांना पाचारण करून ती रक्कम तसेच जैन, सनोडिया आणि पोगलवार या तिघांना त्यांच्या ताब्यात दिले. हवालाची रोकड मिळण्याची या आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे.(प्रतिनिधी)