गुंतवणुकीच्या नावाखाली दिव्यांग महिलेसह नातेवाईकांना ४५ लाखांचा गंडा; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2022 12:46 PM2022-09-26T12:46:23+5:302022-09-26T12:46:45+5:30
'एचडीएफसी' बँकेत व्यवस्थापक असल्याची बतावणी
नागपूर : 'एचडीएफसी बँकेत करत एका महिलेने तिचा भाऊ व इतर साथीदारांसह दिव्यांग महिला तसेच तिच्या नातेवाईकांना ४५ लाखांचा गंडा घातला. पाच वर्षांत दुप्पट रक्कम मिळेल असे त्यांनी आमिष दाखविले होते. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माया शंभरकर (४८, राजगृहनगर) या दिव्यांग असून त्यांची नवनीत कैलाश गजभिये (३५, कपिलनगर) याच्याशी भेट झाली. त्याने त्याची बहिण प्रियदर्शनी गजभिये (३८, कपिलनगर) व तिचा पती एचडीएफसी बँकेत व्यवस्थापक असल्याचे सांगितले. माया यांच्या कुटुंबियांकडे पैसे असल्याची माहिती त्याने काढली होती. दिव्यांगांसाठी बँकेकडून विशेष गुंतवणूक योजना असून त्यात पाच वर्षांत दुप्पट परतावा मिळेल, असे आमिष त्याने दाखविले.
त्याने २९ एप्रिल २०१७ ते ९ मे २०२२ या दरम्यान माया व त्यांची बहीण तसेच इतर नातेवाईकांकडून वेळोवेळी मुदतठेवीच्या नावाखाली ४५ लाख रुपये घेतले. त्याने त्यांना एचडीएफसी बँकेचे मुदतठेवीचे बनावट प्रमाणपत्र व इतर कागदपत्रेदेखील दिली. त्यामुळे कुणालाही संशय आला नाही. पाच वर्ष झाल्यानंतर मुदतठेवीची सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.