नागपूर जिल्ह्यात गोदामात ठेवलेली ४५ लाखांची सुपारी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:00 PM2018-02-09T12:00:15+5:302018-02-09T12:00:27+5:30
मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी फाटा येथे गोदामात ठेवलेली ४५ लाख १८ हजार रुपये किमतीची १८ टन सुपारी चोरट्याने पळविली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी फाटा येथे गोदामात ठेवलेली ४५ लाख १८ हजार रुपये किमतीची १८ टन सुपारी चोरट्याने पळविली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. चोरट्याने २५ आॅक्टोबर ते ६ फेब्रुवारीदरम्यान ही सुपारी पळविली. याबाबत मौदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
अनिल हिरालाल पंडित (५०, रा. सीजीओ कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल, नागपूर) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांचे नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गालगत उमरी फाटा येथे गोदाम आहे. कस्टम ड्युटी न भरल्याने डीआरआय (डायरेक्टोरेट आॅफ रेव्हन्यू डिपार्टमेंट) ने जप्त केलेली सुपारी त्यांच्या गोदामात साठवून ठेवली होती. मंगळवारी (दि. ६) प्रकाश गोयल यांना गोदाम क्र. १ च्या समोर सुपारी अस्ताव्यस्त पडलेली दिसली. त्यामुळे त्यांना सुपारी चोरी गेली असल्याचा संशय येताच त्यांनी याबाबत अनिल पंडित यांना फोनद्वारे सूचना दिली. मात्र रात्र झाल्याने आणि कोणतेही कागदपत्र नसल्याचे किती चोरी झाले हे कळू शकले नाही. फोनवर सूचना मिळताच पंडित हे गोदामस्थळी आले. त्यांना दरवाजाबाहेर सुपारी पडून दिली. त्यामुळे त्यांनी याबाबत मौदा पोलिसांना सूचना दिली. दुसºया दिवशी सकाळी मौदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोदामाची पाहणी केली असता काही शटर हे वाकलेल्या स्थितीत दिसून आले. त्या गोदामात जप्त करून ठेवलेल्या सुपारीपैकी ४५ लाख १८ हजार रुपये किमतीची १८ टन सुपारी चोरट्याने पळविल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत फिर्यादीने मौदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल कावळे करीत आहे.