४६ उमेदवारांचे अर्ज अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:33 AM2017-11-07T00:33:37+5:302017-11-07T00:34:10+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभा, विद्वत् परिषद आणि अभ्यास मंडळातील विविध मतदार संघांच्या निवडणुकांच्या उमेदवारांची प्राथमिक यादी सोमवारी जाहीर झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभा, विद्वत् परिषद आणि अभ्यास मंडळातील विविध मतदार संघांच्या निवडणुकांच्या उमेदवारांची प्राथमिक यादी सोमवारी जाहीर झाली. निवडणुकांसाठी ४६४ उमेदवारांचेच अर्ज आले होते. यातील ४६ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले असून, ४१८ अर्ज पात्र ठरले आहेत. अनेक उमेदवारांनी २ ते ३ गटातून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या ३०० च्या आसपासच आहे. दरम्यान, अविरोध निवड होणे अपेक्षित असलेल्या उमेदवारांवर विविध संघटनांकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे राजकारण तापले आहे.
विधिसभा, विद्वत् परिषद व अभ्यास मंडळांच्या निवडणुकीचे मतदान २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विद्यापीठाच्या विधिसभेमध्ये एकूण ८३ सदस्यांचा समावेश आहे. त्यात ४८ सदस्य निवडून तर ३५ सदस्य नामनिर्देशित करण्यात येईल. निवडणुकीतून येणाºया सदस्यांमध्ये १० पदवीधर, १० शिक्षक, ३ विद्यापीठ शिक्षक, १० प्राचार्य आणि ६ सदस्य महाविद्यालय व्यवस्थापनातील सदस्यांचा समावेश आहे. या जागांवर सर्वाधिक आपापलेच सदस्य असावेत, यासाठी निवडणुकांचा बिगुल वाजण्याअगोदरच विविध संघटनांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती.
विद्यापीठातर्फे सोमवारी प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली. विविध गटांमध्ये ज्यांचे अर्ज अपात्र ठरले, त्यांची यादीदेखील देण्यात आली. विधिसभेसाठी आलेल्या अर्जांपैकी १८ अर्ज अपात्र ठरले.
२१ मंडळांसाठी एकही उमेदवार नाही
विद्यापीठ शिक्षण मंच, ‘यंग टीचर्स असोसिएशन’, ‘नुटा’, ‘सेक्युलर पॅनल’ या संघटनांमध्ये प्रमुख चढाओढ आहे. संघटनांना अनेक ठिकाणी पात्र उमेदवारच सापडले नाहीत. सर्वच अभ्यास मंडळांवर तीन उमेदवार देणे कोणत्याही संघटनेला शक्य झालेले नाही. विद्यापीठात एकूण ७३ अभ्यास मंडळे आहेत. यातील २१ मंडळांवर ३ पेक्षा कमी उमेदवारांचे नामांकन अर्ज आले आहेत. त्यामुळे तेथे निवडणुका होणार नाही, तर २१ मंडळांवर एकही अर्ज आला नाही. त्यामुळे केवळ ३१ अभ्यास मंडळांसाठी निवडणूक होणार आहे.