जिल्ह्यातील गर्भवती महिलांना ४६ कोटींची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:47+5:302021-09-02T04:15:47+5:30
नागपूर : माता व बालमृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यात २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविण्यात येते. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ...
नागपूर : माता व बालमृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यात २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविण्यात येते. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत मातृवंदन योजनेत १,०८,३०३ गर्भवतींची नोंद झाली आहे. त्यांना ४६ कोटी रुपयांची मदत योजनेंतर्गत झाली आहे.
कोरोना काळातही गर्भवती महिलांसाठी आरोग्य विभागाने उद्दिष्टापेक्षा जास्त काम केले आहे. ग्रामीण व आदिवासी भागात अनेक गर्भवती महिलांना प्रसूतीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करावे लागते. त्याचे परिणाम बाळावर व मातेवर होत असल्याने केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्य रेषेवरील मातांसाठी १ जानेवारी २०१७ पासून ही योजना राबविली आहे. योजनेत गर्भवती महिलेस तीन टप्प्यात पाच हजार रुपये देण्यात येते. आरोग्य विभागाच्या माध्यमातून अशा महिलांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत दरवर्षी उदिष्ट दिले जाते. पण नागपूरच्या आरोग्य विभागाने उद्दिष्टापेक्षाही कितीतरी जास्त गर्भवती महिलांची नोंदणी केली असून, त्यांना लाभ मिळवून दिला आहे.
- लाभार्थ्यांचा आढावा
लाभार्थ्यांची आतापर्यंत झालेली नोंदणी - १,०८,३०३
पहिल्या टप्प्याचा लाभा दिलेल्या लाभार्थी महिला - १,००,३२५
दुसऱ्या टप्प्याचा लाभ दिलेल्या लाभार्थी महिला - १,००,६२०
तिसऱ्या टप्प्याचा लाभ दिलेल्या लाभार्थी महिला - ७९,९६३
- तालुकानिहाय तिन्ही टप्प्याचा लाभ मिळालेल्या महिला
भिवापूर - १,४०३, हिंगणा - ५,२७३, कळमेश्वर - २,३६२, कामठी - ३,०००, काटोल - २,०५७, कुही - २,२८१, मौदा - ३,३२८, नागपूर ग्रामीण - ४,८८५, नरखेड - १,९९५, पारशिवनी - २,५८२, रामटेक- २,७०२, सावनेर - ३,६०६, उमरेड - २,५४१
- या योजनेची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. लाभार्थी महिलांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले कागदपत्र द्यावेत. यात फक्त सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाभ घेता येत नाही. या योजनेंतर्गत मातेची काळजी व बालकांचे लसीकरणही केले जाते. त्यामुळे मातामृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.