कर थकवला म्हणून ४६३ मालमत्ता जप्त; लवकरच लिलाव प्रक्रियाही सुरू होणार

By मंगेश व्यवहारे | Published: December 27, 2023 02:26 PM2023-12-27T14:26:23+5:302023-12-27T14:26:39+5:30

महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत मालमत्ता कर आहे. सध्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्ताधारकांवर १०.४४ कोटी रुपये थकबाकी आहेत.

463 properties confiscated for tax default; The auction process will also start soon | कर थकवला म्हणून ४६३ मालमत्ता जप्त; लवकरच लिलाव प्रक्रियाही सुरू होणार

कर थकवला म्हणून ४६३ मालमत्ता जप्त; लवकरच लिलाव प्रक्रियाही सुरू होणार

नागपूर : महापालिकेचा मालमत्ता कर थकविलेल्यांच्या विरोधात महापालिकेने जोरदार मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत ४६३ मालमत्ता महापालिकेने जप्त केल्या आहेत. लवकरच या जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत मालमत्ता कर आहे. सध्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्ताधारकांवर १०.४४ कोटी रुपये थकबाकी आहेत. डिसेंबरपर्यंत मालमत्ता कर न भरल्यास मिळणाऱ्या सवलतीची मुदत संपत असल्याने त्यानंतर मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना २ टक्के अधिक व्याजासह ही रक्कम भरावी लागणार आहे. शहरातील ६.१५ लाख मालमत्ताधारकांपैकी २.८५ लाख मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरल्याची माहिती आहे.

मालमत्ता कर विभागाच्या माहितीनुसार, यंदा आर्थिक वर्षासाठी महापालिकेने २७२ कोटींचे लक्ष्य निर्धारित केले होते. आतापर्यंत महापालिकेला १५९ कोटींचा महसूल मिळवण्यात यश आले आहे. त्याचबरोबर मालमत्ता करांतर्गत असलेली ७५० कोटींच्या थकबाकी वसुलीची मोहिमही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत झोनिहाय थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. नियमितपणे व वेळेत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेने विविध सवलती जाहीर केल्या आहेत.

नेहरूनगर झोनमध्ये सर्वाधिक मालमत्ता जप्त
आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीला सुरुवात होणार असल्याने आतापर्यंत ४६३ मालमत्ताधारकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १०.४४ कोटी रुपयांची वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. थकबाकी न भरणाऱ्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. सध्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये सर्वाधिक मालमत्ता या नेहरूनगर झोनमधील आहेत. या झोनमधून आतापर्यंत १६७ मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून, यावर ३.९० कोटींची थकबाकी आहे. त्यापाठोपाठ ९०.६० लाखांची थकबाकी असलेल्या लकडगंजमधील ८५ मालमत्तांचा समावेश आहे.

Web Title: 463 properties confiscated for tax default; The auction process will also start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर