४७ एकरातील गहू खाक
By admin | Published: March 29, 2017 02:53 AM2017-03-29T02:53:25+5:302017-03-29T02:53:25+5:30
शेतकऱ्याने त्याच्या शेतातील पालापाचोळा व कचरा जाळला. मात्र, वाढते तापमान व जोरात वाहणारी हवा यामुळे ही
१५० एकरात आग पसरली : खोपडी शिवारातील घटना
तारसा : शेतकऱ्याने त्याच्या शेतातील पालापाचोळा व कचरा जाळला. मात्र, वाढते तापमान व जोरात वाहणारी हवा यामुळे ही आग परिसरातील शेतात पसरली. आटोकाट प्रयत्न करूनही ही आग नियंत्रणात न आल्याने अल्पावधीत या आगीने १५० एकर शेतीचा परिसर कवेत घेतला. त्यामुळे ४६.५ एकरातील कापणीला आलेले गव्हाचे उभे पीक राख झाले असून, उर्वरित १०३.५ एकरातील तणस, जनावरांचा चारा आणि पालापाचोळा जळाला. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांच्या मदतीने साडेचार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. ही घटना मौदा तालुक्यातील खोपडी शिवारात मंगळवारी (दि. २८) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
सध्या गव्हाचे पीक कापणीला आले असून, काहींनी शेतातील गव्हाच्या पिकाची कापणीही केली आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी शेतीच्या खरीपपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. शेताची साफसफाई करण्याच्या उद्देशाने खोपडी शिवारातील एका शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास त्याच्या शेतात पालापाचोळा जाळला. जोरात वाहणारी हवा आणि वाढलेले तापमान यामुळे ही आग त्याच्याच शेतातील कापणी केलेल्या गव्हाचे खुंटापर्यंत पसरली. पुढे ही आग पसरतच गेली.
आग वेळीच नियंत्रणात न आल्याने साईबाबा कोरकंचू (५०, रा. हनुमाननगर) ३.५ एकर, कशी इगडपुगट्टी (४१, रा. खेडी) यांच्या ६ एकर, प्रभाकर वासनिक (३५, रा. खेडी) यांच्या २ एकर, सुभाष वासनिक (३६, रा. खेडी) यांच्या ३.५ एकर, मनोज कडू ( ३०, रा. खेडी) यांच्या १२ एकर, प्रभाकर मेश्राम ( ४१, रा. खेडी) यांच्या ३.५ एकर, प्रदीप वासनिक (३०, रा. खेडी) यांच्या ३ एकर, अशोक वासनिक (४०, रा. खेडी) यांच्या २ एकर, जयदेव गजभिये (५१, रा. खेडी) यांच्या ४ एकर, रामकृष्ण नादेला (४१, रा. खेडी) यांच्या २ एकर आणि जयदेव गजभिये (४५, रा. नागपूर) यांच्या ५ एकर अशा एकूण ४६.५ एकरातील कापणीला आलेले गव्हाचे उभे पीक राख झाले. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांच्या तोंडचा घास ऐनवेळी हिरावल्या गेला आहे. हाती आलेले पीक गेल्याचे दु:ख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. (वार्ताहर)