नागपुरात ४ कोटी ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त : दोन वर्षांत ४०७ तस्कर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:18 AM2019-06-25T00:18:48+5:302019-06-25T00:19:56+5:30
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) दोन वर्षांत ४०७ तस्करांना पकडून त्यांच्याकडून ४ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी २६ जूनला अमली पदार्थ प्रतिबंधक दिवस साजरा करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एनडीपीएसकडून सोमवारी ही माहिती उघड करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) दोन वर्षांत ४०७ तस्करांना पकडून त्यांच्याकडून ४ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी २६ जूनला अमली पदार्थ प्रतिबंधक दिवस साजरा करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एनडीपीएसकडून सोमवारी ही माहिती उघड करण्यात आली.
जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीचे १२७ गुन्हे दाखल केले. त्यातील ४० प्रकरणात ७३ लाखांचा ५६१ किलो गांजा जप्त करण्यात आला. १६ लाख रुपयांची कोकेनही जप्त करण्यात आली. पाच लाखांचे चरस, अडीच लाखांचे गर्द जप्त करून पोलिसांनी १७९ तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून अमली पदार्थांसह ९७ लाख ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्याचप्रमाणे १ जानेवारी ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत पोलिसांनी २ कोटी ८६ लाख ९०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १३१ आरोपींना अटक केली. १ जानेवारी ते २४ जून २०१९ या कालावधीत पोलिसांनी ७९ तस्करांना पकडले. त्यांच्याकडून ७४ लाख १३ हजार ४६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशाप्रकारे जुलै २०१७ ते जून २०१९ या कालावधीत एनडीपीएसने ४०७ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४ कोटी ५७ लाख ४४ हजार २१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी अटक केलेल्या तस्करांमध्ये आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, झारखंड, ओडिशा आदी राज्यातील आरोपींचाही समावेश आहे.
आयुक्तांचा संकल्प!
गेल्या सहा महिन्यात आबूसारख्या बड्या तस्कराच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आबूशी मैत्री ठेवणाऱ्या चार पोलीस
उपनिरीक्षकांसह सहा जणांना निलंबित करण्यात आले होते.
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हेगारी नियंत्रित करण्यासोबतच नागपूरला ड्रग फ्री सिटी बनविण्याचा संकल्प जाहीर केला होता. त्यानुसार एनडीपीएसकडून ही कारवाई करण्यात आली.