गुन्ह्यांत बळी पडलेल्यांसाठी ४८ लाख मंजूर
By admin | Published: July 7, 2016 03:00 AM2016-07-07T03:00:00+5:302016-07-07T03:00:00+5:30
महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना’ याअंतर्गत शासनाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणला..
शासनाचा निर्णय : राज्य विधी सेवा प्राधिकरणाला मिळणार निधी
राकेश घानोडे नागपूर
‘महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना’ याअंतर्गत शासनाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणला ४८ लाख रुपये मंजूर केले आहेत. यासंदर्भात गृह विभागाने अधिसूचना जारी केली आहे.
२०१६-१७ वर्षाच्या अर्थसंकल्पात योजनेकरिता ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेंतर्गत राज्य विधी सेवा प्राधिकरणने शासनाकडे ५० लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु, शासनाने ४८ लाख रुपये मंजूर केले असून उर्वरित निधी आवश्यकतेनुसार मागणीपत्र सादर झाल्यानंतर वितरित करण्यात येणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३५७-क अनुसार गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सहकार्याने अशा व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत जीवित हानीसाठी २ लाख, अॅसिड हल्ला झाल्यास ३ लाख तर, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये भरपाई देण्यात येते. याशिवाय अंत्यसंस्कारासाठी २००० व वैद्यकीय उपचारासाठी कमाल १५ हजार रुपये खर्च देण्याची तरतूद योजनेत करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य विधी सेवा प्राधिकरणची आहे. भरपाई मिळवण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे अर्ज सादर करावा लागतो. जिल्हा प्राधिकरणने नुकसान भरपाई नाकारल्यास याविरुद्ध ९० दिवसांमध्ये राज्य विधी सेवा प्राधिकरणकडे अपील करता येते. केंद्र शासन, राज्य शासन, मंडळे, महामंडळे व सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी आणि आयकरदाते यांना वगळून इतर सर्वजण योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत.