एसटीचे संपकरी कामावर रुजू, उत्पन्नाची सावरली बाजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 01:38 PM2022-04-18T13:38:19+5:302022-04-18T13:42:15+5:30
रविवारी नागपूर विभागात संपावर असलेले एकूण ४९ कर्मचारी कामावर रुजू झाले. यात २२ चालक, २५ वाहक, १ यांत्रिक कर्मचारी आणि १ प्रशासकीय कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
नागपूर : संपकरी कर्मचारी रुजू होत असल्यामुळे एसटी बसेसच्या फेऱ्यात वाढ झाली असून, रविवारी २२१ बसेसच्या माध्यमातून २९,२६८ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली.
एसटीचे कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून संपावर गेले आहेत. न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यामुळे कर्मचारी रुजू होत आहेत. त्यामुळे एसटी बसेसची संख्या वाढली असून, विभागात २२१ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे. यात गणेशपेठ आगारातील ५०, इमामवाडा आगारातील ४१, घाट रोड आगारातील ४०, उमरेड आगारातील १५, सावनेर आगारातील १९, वर्धमाननगर आगारातील १९, रामटेक आगारातील १४ आणि काटोल आगारातील २२ बसेसचा समावेश आहे. या बसेसने ६६१४८ किलोमीटर अंतर पूर्ण करून २९२६८ प्रवाशांची वाहतूक केली. याद्वारे नागपूर विभागाला २१ लाख ३३ हजार २७३ रुपये उत्पन्न मिळाले.
रविवारी ४९ कर्मचारी झाले रुजू
रविवारी नागपूर विभागात संपावर असलेले एकूण ४९ कर्मचारी कामावर रुजू झाले. यात २२ चालक, २५ वाहक, १ यांत्रिक कर्मचारी आणि १ प्रशासकीय कर्मचाऱ्याचा समावेश आहे. आगामी २२ एप्रिलपर्यंत उर्वरित कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता आहे.