नागपूर विभागातील धरणात ४९ टक्के पाणीसाठा, पण पुरेल का?
By निशांत वानखेडे | Published: March 30, 2024 08:35 PM2024-03-30T20:35:33+5:302024-03-30T20:36:03+5:30
नागरिकांना जलसंकटाचा सामना करावाच लागणार अशी भीती आहे.
नागपूर : जेमतेम मार्च महिना संपत असताना उन्हाच्या झळा लाेकांची हाेरपळ करीत आहेत. ‘एल-निनाे’ वर्षामुळे पुढचे महिनेही रखरखित हाेण्याचा अंदाज आहे. अशावेळी नागपूर विभागातील धरणांचे पाणी ५० टक्क्यांच्या खाली आले असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही स्थिती बरी असली तरीही नागरिकांना जलसंकटाचा सामना करावाच लागणार अशी भीती आहे.
नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यात १६ माेठे, ४२ मध्यम व ३२५ लघु प्रकल्प आहेत. यातील १६ माेठ्या प्रकल्पातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जाताे. या साेळाही प्रकल्पात सध्या ४८.९७ टक्के जलसाठा आहे, जाे गेल्या वर्षी ४४.५१ टक्क्यावर हाेता. मध्यम प्रकल्पांची स्थिती मागील वर्षीच्या तुलनेत वाईट आहे. सध्या या प्रकल्पात ५४.७७ टक्के साठा आहे, जाे मागील वर्षी ५८.४४ टक्के हाेता. लघु प्रकल्पात साठा ४४.२७ टक्के आहे, जाे मागील वर्षी ४२.२० टक्के हाेता.
यावर्षी उन्हाळा अतिशय रखरखित राहण्याचा अंदाज आहे. एप्रिल व मे महिन्यात उन्हाच्या झळा तीव्र असतात व जूनच्या शेवटपर्यंत विदर्भात मान्सूनचे आगमन हाेते. त्यामुळे पुढचे तीन महिने कठीण ठरणारेच आहेत. दरवर्षीच्या अनुभवानुसार मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत धरणाला काेरड पडलेली असते. क्षमतेपेक्षा पाणीसाठा अर्धा असल्याने यावर्षीही जलसंकटाचा सामना करावा लागेल, ही शक्यता आहे.
विभागातील महत्त्वपूर्ण प्रकल्पातील पाणीसाठा (टक्क्यात)
जिल्हा प्रकल्प वर्तमान साठा गेल्या वर्षीचा साठा
भंडारा बावनथडी ३२.७६
गाेसीखुर्द ४७.६४ ४७.४३
चंद्रपूर आसाेलामेंढा ३४.८६ २३.३२
गडचिराेली दिना २०.७३ ४३.५७
गाेंदिया इटियाडाेह ४४.१६ ३४.७१
पुजारी टाेला ४५.७४ ६५.३५
धापेवाडा ९०.९४ ३८.८८
सिरपूर ३४.०१ ७०.७७
वर्धा बाेर ३७.१६ ...
निम्न वर्धा ५४.६५ ६५.३९
नागपूर जिल्ह्यातील साठा
कामठी खैरी ५१.५६ ...
खिंडसी ६२.७४ ...
नांद १०.७७ १९.३५
ताेतलाडाेह ६१.११ ६६.३०
वडगाव ४०.२४ ३८.७२