४.९० लाखाचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:06 AM2020-12-07T04:06:55+5:302020-12-07T04:06:55+5:30
कामठी : पाेलिसांनी कामठी शहरातील कमसरी बाजार-गांधीनगर मार्गावर कारवाई करीत गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. यात वाहनातील चार ...
कामठी : पाेलिसांनी कामठी शहरातील कमसरी बाजार-गांधीनगर मार्गावर कारवाई करीत गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. यात वाहनातील चार गुरांची सुटका करीत एकूण ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. वाहनचालक व मालक पळून गेल्याने पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. ५) मध्यरात्री करण्यात आली.
कामठी (जुनी) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना कामठी शहरातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी शहरातील कमसरी बाजार ते गांधीनगर दरम्यानच्या राेडवर एमएच-१६/सीसी-१७२३ क्रमांकाच्या छाेट्या मालवाहू वाहनाचा पाठलाग सुरू केला. चालकाने मध्येच वाहन थांबविले आणि ते साेडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. झडतीदरम्यान त्या वाहनात चार गुरे काेंबली असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले.
ती गुरांची अवैध वाहतूक असून, ती सर्व जनावरे शहरातील कत्तलखान्यात नेत असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनातील चारही गुरांची सुटका करीत त्यांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. शिवाय, वाहन ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन आणि ४० हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलीस निरीक्षक राधेश्याम पाल यांनी दिली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, ही कारवाई पाेलीस कर्मचारी धर्मेद्र राऊत यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.