नागपुरात ११२०० झाडांवर ४.९५ कोटींचा खर्च : ५६ रस्त्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 09:26 PM2019-09-17T21:26:39+5:302019-09-17T21:28:12+5:30
‘एक व्यक्ती एक झाड, करू या शहर हिरवेगार’ या संकल्पनेनुसार महापालिकेने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. यावर ४ कोटी ९४ लाख ५४ हजार ७६८ रुपये खर्च केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेवटर्क
नागपूर : ‘एक व्यक्ती एक झाड, करू या शहर हिरवेगार’ या संकल्पनेनुसार महापालिकेने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सिमेंट व डांबरी अशा ५६ रस्त्यांच्या दुतर्फा ११२०० झाडे लावणे, त्याची दोन वर्ष देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेच्या उद्यान विभागाने खासगी कंपनीकडे सोपविली आहे. यावर ४ कोटी ९४ लाख ५४ हजार ७६८ रुपये खर्च केला जाणार आहे.
शहरातील सिमेंट काँक्रीट व डांबरी रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावून त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी मे.रेन्बो ग्रीनर्स कंपनीवर सोपविण्यात आली आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांचा आपल्या घरापुढे झाडे लावण्याला विरोध होतो. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला झाडे लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. वृक्षारोपणावरील खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
मौजा दिघोरी येथील योगेश्वर नगर गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेत उद्यान विकसित करणार आहे. यावर ३६ लाख ९० लाखांचा खर्च अपेक्षित असून याबाबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे.
२० चौकांच्या सल्लागारावर ७३ लाखांचा खर्च
शहरातील मुख्य २० चौकांची पुनर्रचना केली जाणार आहे. यासाठी आराखडा तयार करणाऱ्या सल्लागारावर प्रतिचौक ३.६९ लाखानुसार ७३ लाख ८ हजारांचा खर्च केला जाणार आहे. मे. यूम.एम.टी.सी. हैदराबाद कंपनीने याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. वाहतूक विभागाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविला आहे.
सिमेंट कामासाठी २५ कोटी
महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर भागातील श्री कॉलनी, दुबेनगर, रेणुकामातानगर, सावरबांधे सभागृहाजवळ, महालक्ष्मीनगर व राजापेठ परिसरात सिमेंटीकरण व नाली बांधकामासाठी १५ कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. यात महापालिकेचा वाटा ५ कोटीचा आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविला आहे.