२६ कंपन्यांचा ४९८.५० कोटींचा खोट्या व्यवहाराचा घोटाळा उजेडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:07 AM2021-01-09T04:07:01+5:302021-01-09T04:07:01+5:30
नागपूर : बनावट पावत्यांच्या व्यवहाराविरूद्ध सुरू असलेल्या तपासणी मोहिमेचा एक भाग म्हणून गेल्या पंधरवड्यात डीजीजीआय, नागपूर झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी ...
नागपूर : बनावट पावत्यांच्या व्यवहाराविरूद्ध सुरू असलेल्या तपासणी मोहिमेचा एक भाग म्हणून गेल्या पंधरवड्यात डीजीजीआय, नागपूर झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रभर विविध औद्योगिक क्षेत्र व्यापलेल्या अनेक ठिकाणी शोधमोहिम राबविली. या मोहिमेंतर्गत २६ कंपन्यांचा ४९८.५० कोटींचा बनावट व्यवहाराचा आर्थिक घोटाळा उजेडात आला. त्याअंतर्गत आरोपींनी घेतलेल्या ८९.६३ कोटींच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटपैकी १२.७८ कोटी रुपये घटनास्थळावरून जप्त केले. या घोटाळ्यात एकाला अटक केली.
या कंपन्यांच्या माध्यमातून सुपारी व कोळसा ते कापड वस्तू आणि लोखंड व पोलाद उत्पादनांपर्यंतच्या विविध करपात्र वस्तूंचा व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. मोठ्या संख्येने अस्तित्त्वात नसलेल्या किंवा व्यवसाय नसलेल्या कंपन्या निवासी ठिकाणी आढळून आल्या. या कंपन्यांनी व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा म्हणून जीएसटी पोर्टलवर वीजबिल आणि भाडे करारांसारखी बनावट कागदपत्रे अपलोड केली होती. कार्यरत असलेल्या कंपन्यांनी कोणत्याही वस्तूंच्या पावत्याविना इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे अधिकृत व्यक्तीकडून चौकशीत आढळून आले. इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी या कंपन्यांनी अवलंबिलेल्या फसव्या पद्धतीची पुष्टी केली. या कंपन्यांनी ४९८.५० कोटींच्या बनावट कागदी व्यवहारावर एकूण ८९.७३ कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले. यापैकी १२.७८ कोटी रुपये अधिकाऱ्यांनी जप्त केले. या प्रकरणी गुरुवारी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीत बनावट इनव्हॉईस रॅकेटमध्ये सहभागी लोकांचा खुलासा होण्याची अपेक्षा आहे.