नागपुरात ‘ईडी’च्या हाती घबाड; पाच कोटींचे दागिने, हिरे; सव्वा कोटी रोकड जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 05:47 AM2023-03-07T05:47:24+5:302023-03-07T05:47:53+5:30

आणखी ‘लिंक्स’, मोठे मासे गळाला लागणार?

5-51-cr-jewellery1-21-cr-cash-seized-by-ed-in-raids-at-pankaj-mehadia-and-others-nagpur-mumbai-raid-notice to 9 people | नागपुरात ‘ईडी’च्या हाती घबाड; पाच कोटींचे दागिने, हिरे; सव्वा कोटी रोकड जप्त 

नागपुरात ‘ईडी’च्या हाती घबाड; पाच कोटींचे दागिने, हिरे; सव्वा कोटी रोकड जप्त 

googlenewsNext

नागपूर : पंकज मेहाडियाने केलेल्या ‘पाँझी’ घोटाळ्यात ईडीने शुक्रवारी नागपूर व मुंबईत १५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मोठे घबाड हाती लागले असून रोकड, सोन्याचे दागिने, हिरे अशी पावणेसात कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ‘ईडी’च्या सूत्रांनुसार छाप्यांत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे पुढील चौकशी सुरू आहे. आणखी ‘लिंक्स’ समोर येण्याची शक्यता असून मोठे मासे गळाला लागू शकतात. 

शुक्रवारच्या छाप्यात ‘ईडी’च्या हाती मोठे घबाड लागल्याची माहिती होतीच. त्याचे तपशील सोमवारी ‘ईडी’ने जाहीर केले. आरोपींची नावेही जाहीर करण्यात आली. काही वर्षांअगोदर सीताबर्डी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने ‘पीएमएलए’अंतर्गत तपास सुरू केला होता. पंकज नंदलाल मेहाडिया, लोकेश संतोष जैन, कार्तिक संतोष जैन, बालमुकुंद लालचंद केयल, प्रेमलता नंदलाल मेहाडिया यांनी फसवणूक करून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचे हे प्रकरण होते.  चौकशीदरम्यान पंकज मेहाडियासह अन्य साथीदारांनी पाँझी स्कीमच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना १२ टक्के नफ्याचे आमिष दाखवत फसवणूक केली. २००४ ते २०१७ या कालावधीत त्यांनी ही पाँझी स्कीम चालविली. त्यांच्याकडे शेकडो कोटी रुपये आले व त्यातील मोठे गुंतवणूकदार, फर्म्स व कंपन्यांना आरोपींनी परतावा दिलाच नाही. 

९ लोकांना नोटीस, चौकशीसाठी बोलावले
सापडलेल्या दस्तावेजांतून पैशांच्या ‘ब्लॅक अँड व्हाइट’चा खेळ उघड झाला आहे. ‘ईडी’ने चौकशीसाठी ९ लोकांना नोटीस जारी केल्या असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या नऊ जणांची नावे समोर येऊ शकलेली नाहीत.

हिऱ्याचे दागिने, लॅपटॉपदेखील जप्त
तीन मार्च रोजी १५ ठिकाणी ईडीच्या पथकांनी शोधमोहीम राबविली. पथकांनी पंकज मेहाडिया, लोकेश जैन, कार्तिक जैन, सनविजय स्टीलचे संचालक संजय अग्रवाल, आर. के. संदेश ग्रुपचे बिल्डर रामदेव अग्रवाल, त्यांचा भाऊ दिलीप अग्रवाल, चंद्रा कोलचे संजय अग्रवाल, व्हायब्रंट ग्रुपचे विनोद गर्ग, राजेश स्टील अँड वायरचे सुरेश बाजोरिया आणि सीए अनिल पारेख यांच्याकडे छापे टाकले. नागपूर व मुंबईतील छाप्यांमधून ५.५१ कोटी रुपयांचे सोने व हिऱ्याचे दागिने, १.२१ कोटींची रोख, लॅपटॉपसह डिजिटल उपकरणे व महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेण्यात आले. ईडीने केलेल्या कारवाईत १.२१ काेटी रुपयांची राेख रक्कम व ५ काेटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे साेने आणि हिऱ्याचे दागिने जप्त करण्यात आले.

मेहाडियाने दीडशे कोटीहून अधिक रक्कम दुसरीकडे वळती करताना बनावट नोंदी केल्या. यात विविध लोकांची मदत घेण्यात आली होती. या फसवणुकीच्या हायप्रोफाइल प्रकरणातील इतर ‘लिंक्स’ शोधण्यात येत असून छाप्यांदरम्यान हाती आलेल्या दस्तावेजांतून निश्चितच दिशा मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: 5-51-cr-jewellery1-21-cr-cash-seized-by-ed-in-raids-at-pankaj-mehadia-and-others-nagpur-mumbai-raid-notice to 9 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.