‘५डी बीम टूल’ने मेट्रो प्रकल्प वेळेवर साकारणार
By admin | Published: February 18, 2017 02:38 AM2017-02-18T02:38:44+5:302017-02-18T02:38:44+5:30
५ डायमेंशन (डी) बीम (बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेल) टूल’च्या मदतीने नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प वेळेत साकार होण्यास मदत होणार आहे.
महामेट्रो बीम अकॅडमी दाखल : अन्य मेट्रोच्या अधिकाऱ्यांना मिळणार प्रशिक्षण
नागपूर : ‘५ डायमेंशन (डी) बीम (बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेल) टूल’च्या मदतीने नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प वेळेत साकार होण्यास मदत होणार आहे. या टूलच्या समुचित उपयोगासह त्याचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने ‘महामेट्रो बीम अकॅडमी’चे उद्घाटन सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये शुक्रवारी एका समारंभात करण्यात आले.
आयआयटी, मुंबईचे कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक पद्मश्री डॉ. दीपक फाटक यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, प्रत्येक प्रकल्पात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. पण ‘५डी बीम टूल’मुळे प्रकल्प वेळेत साकार होऊ शकतो. नागपूर मेट्रो प्रकल्प मोठा आहे. १८१८ मध्ये ग्रेट इंडियन पेनेन्सुला रेल्वेनंतर आता एवढ्या मोठ्या स्तरावर रेल्वे प्रकल्प साकार होत आहे. या प्रकल्पाचा दर्जा, पायाभूत सुविधा आणि सेवा दर्जेदार होण्यासह प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यामध्ये इंग्लंड येथील बेंटले इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने सुरू करण्यात येणारी बीम अकॅडमी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.
या अकॅडमीच्या माध्यमातून नागपूर व पुणे मेट्रोसह अन्य मेट्रो प्रकल्प आणि सरकारी विभागातील कर्मचारी, कंत्राटदार, सल्लागार, शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. दीपक फाटक म्हणाले, कोणत्याही प्रकल्पाला वेळेत पूर्ण करताना त्याची गुणवत्ता, गुंतवणूक आणि वेळ महत्त्वपूर्ण असते. यादरम्यान उत्तम समन्वयानंतरच प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतो. या दिशेने महामेट्रो बीम अकॅडमी नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बीम अकॅडमी असलेली ही देशातील पहिली मेट्रो आहे. आयटी क्षेत्रातील सर्व्हिस इंडस्ट्रीजसुद्धा या अकॅडमीचा लाभ घेऊ शकतात. या सिस्टीममुळे मेट्रोच्या सर्व घटकांना एकत्रित करता येणार आहे. आयटीच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा घ्यावा, असे फाटक म्हणाले.
समारंभात महामेट्रोच्या रोलिंग स्टॉक अॅण्ड सिस्टीम्सचे संचालक सुनील माथूर, प्रकल्प संचालक महेश कुमार, वित्त संचालक एस. शिवामाथन, बेंटले बीम अॅडव्हान्समेंट अकॅडमीचे संचालक डेव्हिड रॉबर्टसन, बेंटले इन्स्टिट्यूटचे बीम व्यवस्थापक डेजान पेपिक, बेंटले इन्स्टिट्यूटचे ग्लोबल प्रमुख विनायक त्रिवेदी, बेंटले सिस्टीम्सचे उपाध्यक्ष कौशिक चक्रवर्ती, एएचईचे संचालक उपागुप्ता पटनायक प्रामुख्याने उपस्थित होते.
डेव्हिड रॉबर्टसन आणि डेजान पेपिक यांनी पॉवर सादरीकरणाद्वारे ब्रिटनच्या क्रॉसरेल्वे प्रकल्पातील बेंटलेची भूमिका स्पष्ट केली आणि महामेट्रोशी जुळल्याबद्दल समाधान व्यक्त केले. संचालन विनायक त्रिवेदी यांनी केले तर एस. गोस्वामी यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
महामेट्रो आणि खासगी मोबाईल कंपनीत करार
मेट्रो रेल्वे आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सीमलेस हाय स्पीड ४जी वायफाय सेवा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी महामेट्रो आणि एक खासगी मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीसोबत शुक्रवारी समारंभात सामंजस्य करार करण्यात आला. ही सुविधा उपलब्ध करून देणारी नागपूर मेट्रो देशातील पहिली कंपनी ठरणार आहे. निश्चित कालावधीसाठी वायफाय सुविधा नि:शुल्क राहील. त्यानंतर आवश्यक शुल्क द्यावे लागेल. या सुविधेत रियल टाईम अपडेट, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनासाठी गेमिंग कियोस्कची सुविधा देण्यात येईल. यादरम्यान जाहिरात प्रसारित होणार आहे.