उन्हाचा तडाखा, १३ दिवसांत उष्माघाताचे ५ मृत्यू; रुग्णसंख्येत ६४ टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 11:12 AM2022-05-02T11:12:41+5:302022-05-02T11:18:43+5:30
उष्माघाताचे आतापर्यंत एकूण ९५ रुग्ण आढळून आले असून, ९ रुग्णांचा जीव गेला आहे.
नागपूर : यंदा भीषण उन्हाळा जाणवत आहे. नागपूरचे तापमान ४५ अंशावर गेले आहे. सूर्याच्या तीव्र प्रकोपामुळे उष्माघाताच्या रुग्णांत वाढ झाली आहे. मागील १३ दिवसांत ५ मृत्यूची व ६१ नव्या रुग्णांची भर पडली. उष्माघाताचे आतापर्यंत एकूण ९५ रुग्ण आढळून आले असून, ९ रुग्णांचा जीव गेला आहे.
यावर्षी मे महिन्याची तीव्रता एप्रिल महिन्यातच दिसून आली. यामुळे पुढील महिन्यात तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाचा दुष्परिणाम शरीरावर पडत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांत वाढ होत आहे. १ मार्च ते ४ एप्रिल यादरम्यान नागपूर जिल्ह्यात २६ रुग्ण व २ मृत्यूची नोंद होती. १२ दिवसांत म्हणजे १६ एप्रिल रोजी रुग्णांची एकूण संख्या ३४ झाली, तर मृतांची संख्या ४ वर पोहोचली; परंतु मागील १३ दिवसांतच रुग्णसंख्येत ६४ टक्क्यांनी वाढ झाली. ही संख्या चिंता वाढविणारी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-२०१७ मध्ये होते २९३ रुग्ण
उपसंचालक, आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये २९३ रुग्णांची नोंद होती. मात्र, त्यावर्षी एकही मृत्यू नव्हता. २०१८ मध्ये रुग्णसंख्या कमी होऊन २७७ वर आली. २०१९ ची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. २०२० ते २०२१ यादरम्यान कोरोनाचा कहर असल्याने रुग्णांच्या नोंदीच घेण्यात आल्या नाहीत; परंतु यावर्षी १ मार्च ते २९ एप्रिलदरम्यान ९५ रुग्ण आढळून आले आहेत. मे महिन्यात यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.