एका पाठोपाठ ५ जणांचा कोरोनाने मृत्यू, विद्यापीठ कर्मचाऱ्यांमध्ये दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 09:43 PM2021-05-08T21:43:34+5:302021-05-08T21:47:34+5:30
Corona death , University, panic राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गेल्या काही दिवसात ५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शनिवारी एका युवा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे भीती आणखी वाढली आहे. संक्रमण वाढत असताना विद्यापीठाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी कुठलीही दखल घेतली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गेल्या काही दिवसात ५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शनिवारी एका युवा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे भीती आणखी वाढली आहे. संक्रमण वाढत असताना विद्यापीठाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी कुठलीही दखल घेतली नाही.
आतापर्यंत विद्यापीठ प्रशासनाने कर्मचाऱ्यांचा विमा काढला नाही. कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची कुठलीही व्यवस्था केली नाही. विद्यापीठात बहुतांश कर्मचारी युवा आहेत. विद्यापीठ गंभीर नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की आमच्यामुळे कुटुंबीयांना धोका आहे. प्रशासनाने त्याची दखल घ्यावी. संक्रमणाचे वाढते रुग्ण लक्षात घेता कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक व गोंडवाना विद्यापीठाने कर्मचाऱ्यांचा २ लाख रुपयांचा विमा काढला आहे. कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठीसुद्धा प्रयत्न केले आहे. परंतु नागपूर विद्यापीठाकडून कुठलीही देखल घेण्यात आली नाही.
व्यवस्थापन परिषदेत निर्णय झाला
यासंदर्भात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, ते म्हणाले की दोन्ही विद्यापीठांच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. या प्रस्तावात कोरोना संक्रमण झालेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळेल याबाबत चर्चा झाली आहे.
सिनेट सदस्यांची मागणी
शनिवारी युवा कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर सिनेट सदस्य अॅड. मनमोहन वाजपेयी यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना पत्र लिहिले. यात मागणी केली की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करावी. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी.