५ लाख बालकांनी घेतली जंतनाशकाची गोळी; पहिल्याच दिवशी ९१.४२ टक्के उद्दिष्ट पूर्ण
By गणेश हुड | Published: February 16, 2024 07:30 PM2024-02-16T19:30:50+5:302024-02-16T19:33:35+5:30
मोहिमेच्या शुभारंभावेळी सौम्या शर्मा यांनी फेटरी येथील जिल्हा पिरषद शाळा व अंगणवाडीला भेट दिली.
नागपूर: जंतू संसर्गापासून १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील पात्र लाभार्थींपैकी जवळपास ९१.४२ टक्के म्हणजेच ५ लाख विद्यार्थ्यांनी या गोळ्यांचे सेवन केले.
आतड्यांमधील कृमी दोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणास कारणीभूत आहे. यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यावर याचा विपरित परिणाम होतो. तीव्र प्रमाणात कृमी दोष असलेले विद्यार्थी हे बऱ्याचदा आजारी असतात. त्यांना लवकर थकवा येतो व अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू शकत नाही. यामुळे ते बऱ्याचदा शाळेत अनुपस्थित असतात. आतड्यांमधील कृमी दोष याचा प्रसार बालकांमध्ये दूषित मातीव्दारे सहजतेने होतो. त्यामुळेच राष्ट्रीय जंतनाशक दिनापासून ही मोहिम हातात घेण्यात आली. मोहिमेच्या शुभारंभावेळी सौम्या शर्मा यांनी फेटरी येथील जिल्हा पिरषद शाळा व अंगणवाडीला भेट दिली.