राज्यातील ५ औष्णिक वीज केंद्रे रविवारी राहिली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 11:33 AM2020-04-07T11:33:50+5:302020-04-07T11:34:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी रात्री ९ वाजता नागरिकांनी आपापल्या घरातील लाईट बंद केले, त्यावेळी राज्यातील केवळ दोनच औष्णिक वीज केंद्रे सुरू होती. उर्वरित पाच औष्णिक वीज केंद्रांना बंद ठेवण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी रात्री ९ वाजता नागरिकांनी आपापल्या घरातील लाईट बंद केले, त्यावेळी राज्यातील केवळ दोनच औष्णिक वीज केंद्रे सुरू होती. उर्वरित पाच औष्णिक वीज केंद्रांना बंद ठेवण्यात आले होते. विजेची उर्वरित मागणी जलविद्युत केंद्रातून पूर्ण करण्यात आली.
स्टेट लोड डिस्पॅच सेंटर पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यांना याची अपेक्षा होती की राज्यात जवळपास १७०० मेगावॅट विजेची मागणी कमी होईल. झालेही तसेच. पॉवर सिस्टिम आॅपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आकडेवारीनुसार १,७४४ मेगावॅट विजेची मागणी कमी झाली. राज्यातील वीज कंपन्यांनी मात्र १,४७९ मेगावॅटचा परिणाम पडल्याचा दावा केला आहे. महावितरणनुसार रविवारी सायंकाळी ७.३० वाजता एकूण मागणी १४,०५२ मेगावॅट होती, यात मुंबईचा वाटा ४०२ मेगावॅट इतका होता. ९ वाजताच मागणी कमी होणे सुरू झाले. कॉर्पोरेशनद्वारा ओपन एक्सेसला सामील केल्यामुळे त्याचे आकडे थोडे अधिक आहेत. राज्यात स्टेट लोड डिस्पॅच सेंटरचे कामावर लागले होते. ग्रिड वाचवण्यासाठी नाशिक, खापरखेडा, परळी, चंद्रपूर, भुसावळ औष्णिक वीज केंदे्र या दरम्यान बंद ठेवण्यात आली. औष्णिक वीज केंद्राच्या या बॅकडाऊन दरम्यान जलविद्युत प्रकल्प राज्यासाठी वरदान ठरले. कोयना जलविद्युत प्रकल्पातून १८३० मेगावॅट व टाटाच्या जलविद्युत प्रकल्पातून ४०२ मेगावॅट विजेचे उत्पादन करून राज्याची मागणी पूर्ण करण्यात आली.
महाराष्ट्राने देशाला सतर्क केले
ऊर्जा विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एकाच वेळी लाईट बंद केल्याने निर्माण होणाऱ्या संभावित धोक्याबाबत महाराष्ट्रानेच देशाचे लक्ष वेधले, सतर्क केले. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लाईट सुरू ठेवून दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन केले होते. यानंतर परिस्थितीवर देशव्यापी चर्चा सुरू झाली. नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरपासून तर प्रत्येक राज्यातील लोड डिस्पॅच सेंटरने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढाकार घेतला.