एप्रिलमध्ये सोन्यात ५ हजारांची वाढ; भाव ७४ हजारांवर; चांदीची लाखाकडे वाटचाल
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 17, 2024 06:52 PM2024-04-17T18:52:27+5:302024-04-17T18:55:39+5:30
चांदीची लाखाकडे वाटचाल सुरू आहे. दरवाढीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंची खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
नागपूर : मार्च महिन्यात नागपुरात सोन्याचे भाव ५,३०० हजारांनी वाढले होते. ही दरवाढ एप्रिल महिन्यातही सुरू असून पहिल्या १७ दिवसात सोन्याचे दर ५ हजारांनी वाढून मंगळवारी ७४ हजारांवर पोहोचले. चांदीचे प्रति किलो दर ८,१०० रुपयांनी वाढून ८४ हजारांवर गेले. बुधवारी ३ टक्के जीएसटीसह सोने ७६,२२० आणि चांदी ८६,५२० रुपयांवर गेली. चांदीची लाखाकडे वाटचाल सुरू आहे. दरवाढीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंची खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
नागपुरात १२ एप्रिलला सोन्याचे दर जीएसटीविना ७४,२०० रुपये होते. मात्र, १५ रोजी एक हजाराच्या घसरणीसह ७३,२०० रुपयांपर्यंत कमी झाले. तर चांदीचेही दर एक हजाराने कमी होऊन प्रति किलो ८४,३०० रुपयांवर स्थिरावले. तसे पाहता दागिने २२ कॅरेट सोन्यात तयार केले जातात. सराफा बाजारात २२ कॅरेटची सर्वाधिक विक्री होते. या सोन्याच्या दरात १७ दिवसांत ४,६०० हजारांची वाढ झाली. बुधवारी ३ टक्के जीएसटीसह दर ७०,८६४ रुपयांवर पोहोचले.