धावत्या रेल्वेत बांधल्या अपहरणकर्त्याच्या मुसक्या, अपहृत चिमुकल्याची सुटका

By नरेश डोंगरे | Published: December 29, 2022 06:27 PM2022-12-29T18:27:28+5:302022-12-29T18:29:51+5:30

लहानग्या बहिणींचे प्रसंगावधान : रेल्वे पोलिसांची तत्परता : राजस्थानमधील आरोपी गजाआड

5 year old boy kidnapped in a running train, railway police rescue the child and arrest kidnapper | धावत्या रेल्वेत बांधल्या अपहरणकर्त्याच्या मुसक्या, अपहृत चिमुकल्याची सुटका

धावत्या रेल्वेत बांधल्या अपहरणकर्त्याच्या मुसक्या, अपहृत चिमुकल्याची सुटका

googlenewsNext

नागपूर : भल्या सकाळी लहानग्या बहिणी आपल्या भावासह खेळत असल्याचे पाहून त्याने या तिघांना चॉकलेटचे आमिष दाखवून उचलले. नागपूर स्थानकावर आणले. दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये तीनही बहिण भावंडांना जबरदस्तीने बसवण्याचे तो प्रयत्न करू लागला. मात्र, ८ आणि ९ वर्षे वय असलेल्या 'त्या' दोघींना त्याचे कलुषित मनसुबे लक्षात आल्याने त्यांनी दूर पळ काढला. त्यामुळे त्यांच्या ५ वर्षीय भावाला घेऊन तो निघून गेला. धडधडत्या ट्रेनमध्ये आपल्या भावाला नेल्याने त्या दोघी सैरभैर झाल्या. रेल्वेस्थानकावरील चाईल्ड लाईनचे सहकारी तसेच रेल्वे पोलिसांनी त्यांना हेरले. विश्वासात घेऊन विचारपूस केली अन् एका पाच वर्षीय चिमुकल्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा उजेडात आला. मुलींच्या माहितीवरून त्यांच्या महादुला कोराडी येथील नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला. तिकडे मुले गायब झाल्यामुळे ते कोराडी पोलिसांकडे पोहचले होते.

हिवाळी अधिवेशन सुरू असताना घडलेल्या या चिमुकल्याच्या अपहरणाच्या गुन्ह्याने पोलीस यंत्रणा हादरली. रेल्वे पोलिसांनी एकीकडे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. दुसरीकडे आरोपीचे नाव, पत्ता शोधणे सुरू झाले. त्याचे नाव रामपाल असून तो राजस्थानमधील नागाैर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे आणि त्यानेच पाच वर्षीय युगचे अपहरण केल्याचे पुढे आले. त्याला घेऊन तो तेलंगणा एक्सप्रेसच्या कोच नंबर एस - ७ मध्ये बसून गेल्याचेही स्पष्ट झाले. रेल्वे पोलिसांनी त्या बोगीत कर्तव्यावर असलेल्या तिकिट तपासणीसाचा (टीसी) नाव आणि नंबर मिळवून आरोपी रामपाल अन अपहृत चिमुकला त्या कोचमध्ये आहे की नाही, त्याची शहानिशा करवून घेतली. रामपाल मुलाला घेऊन बसून असल्याचे स्पष्ट झाले. तोवर ही रेल्वेगाडी मध्यप्रदेशातील आमला स्थानकाजवळ पोहचली होती.

रेल्वेच्या पोलीस निरीक्षक मनीषा काशिद यांनी ही गाडी आमला स्थानकावर थांबवून घेतली. तेथे आरोपी रामपालच्या तावडीतून अपहृत चिमुकल्याची सुटका करून त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, ईकडे हे ऑपरेशन सुरू असताना कोराडीचे ठाणेदार रवी नागोसे, एपीआय चंद्रकांत पाटील यांनी आमला येथे आपली टीम पाठवून आरोपी तसेच चिमुकल्याला ताब्यात घेऊन बुधवारी नागपुरात आणले. अपहृत चिमुकल्याला पालकांच्या स्वाधिन करून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी रामपाल हा राजस्थानमधील नागाैर जिल्ह्यात राहतो. तो शेळ्यामेंढ्या चारतो. कधी भूट्टे विकतो. त्याची पत्नी नागपुरातील असून तिने त्याच्यापासून काडीमोड घेतला आहे.

अपहरणाचा उद्देश गुलदस्त्यात

काडीमोड घेतलेली बायको आणि तिचे नातेवाईक येथे राहत असल्याने रामपाल अधून मधून यायचा. नातेवाईकांकडे राहायचा अन् निघून जायचा. यावेळीही तो आला मात्र त्याने जाताना मोठा गुन्हा केला. अपहृत चिमुकला आरोपी रामपालचा नातू लागतो. त्याने कोणत्या उद्देशाने त्याचे अपहरण केले. ते स्पष्ट झाले नाही. मात्र, अपहृत चिमुकल्याच्या लहानग्या बहिणींनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेमुळे एक मोठा गुन्हा टळला.

Web Title: 5 year old boy kidnapped in a running train, railway police rescue the child and arrest kidnapper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.