चिल्यापिल्यांची पहिल्याच दिवशी शाळेत ५० टक्के उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 10:51 AM2021-12-02T10:51:38+5:302021-12-02T10:54:57+5:30
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची भीती, स्कूल बसला न मिळालेली परवानगी, एसटीचा संप अशातही पहिल्या दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांनी शाळा उपस्थिती लावली.
नागपूर : कोरोना आला आणि दोन वर्षापूर्वी चिल्यापिल्यांच्या शाळेचे दरवाजे बंद झाले. अजूनही कोरोनाचे सावट काही सरले नाही. पण विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती मात्र खुंटली. त्यामुळे शासन-प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची दखल घेत, ग्रामीण भागातील १ ते ४ वर्गाच्या शाळा सुरू केल्या.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची भीती, स्कूल बसला न मिळालेली परवानगी, एसटीचा संप अशातही पहिल्या दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांनी शाळा उपस्थिती लावली. विशेष म्हणजे, आज शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्याही चेहऱ्यांवर उमटला होता.
ग्रामीण भागात १ ते ४ चे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली होती. सोबतच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक सूचनांची भलीमोठी यादीही शाळांना दिली होती. शाळा व्यवस्थापनानेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शक्य त्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही म्हणून शाळेच्या पटांगणात सोशल डिस्टन्सिंग राहावे म्हणून आखणी केली.
शाळेच्या प्रवेशद्वारावर एका शिक्षकाने हातात थर्मल स्कॅनरने विद्यार्थ्यांचे तापमान मोजले. दुसऱ्याने शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनिटायझर टाकले तर मुख्याध्यापकांनी पुष्प देऊन मुलांचे स्वागत केले. प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी अशा पद्धतीने बैठकीची व्यवस्था करण्यात आली. नियमानुसार शाळा भरल्या की नाही हे बघण्यासाठी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी व त्यांच्या पथकाने शाळाशाळांमध्ये भेटी दिल्या.
६४,७८० विद्यार्थ्यांची उपस्थिती
नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील वर्ग १ ते ४ च्या २०२१ पैकी १८९८ शाळा सुरू झाल्या. यात पटावर १,२८,०९१ आहेत. पण पहिल्या दिवशी ६४,७८० विद्यार्थी शाळेत पोहोचले होते. पालकांमध्ये अजूनही कोरोनाची थोडी भीती कायम असल्याने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती थोडी कमी होती. पण आठवडाभरानंतर नक्कीच विद्यार्थी वाढतील. पहिल्या दिवशी विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह कमालीचा होता. शासनाने दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे शाळांनी पालन केले.
- चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी, जि.प. (प्राथ.)
शहरीभागात प्रतिसाद थोडा कमी
जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या हद्दीत असलेल्या वर्ग १ ते ७ च्या २८७ शाळांपैकी २५१ शाळा सुरू झाल्या. यात ५२,६६१ विद्यार्थी पटावर आहेत. यापैकी पहिल्याच दिवशी १७,७७४ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. विशेष म्हणजे जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या हद्दीतील १ ते ७ च्या शाळांना शासनाने सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
- दीड वर्षापासून घरी असलेले विद्यार्थी शाळा सुरू न झाल्यामुळे वैतागून गेले होते. आम्ही पालक मुलांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेता चिंतेत होते. गावातील शाळा ओस पडलेल्या होत्या. आज शाळा सुरू झाल्याने मुले आनंदी आहेत. आम्हालाही शाळा सुरू झाल्याचा आनंद आहे.
- विद्या अंबाडकर, पालक.
- आजपासून आमची शाळा सुरू झाली. आज आमच्या मॅडमने आम्हाला भेटवस्तू देऊन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळा सुरू झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला.
- ईशिका गायकवाड, विद्यार्थिनी