CoronaVirus News: मानवी चाचणीसाठी ५० कोव्हॅक्सिन वॉरिअर्स सज्ज; पुढील आठवड्यापासून चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 12:29 AM2020-07-24T00:29:34+5:302020-07-24T06:26:08+5:30
या आठवड्यात तपासणी
नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलची निवड झाल्यानंतर चाचणीसाठी आतापर्यंत ५० लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. धोका पत्करून कोरोनाला हरविण्यासाठी हे योद्धे समोर आले आहेत. या आठवड्यात त्यांची तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. योग्य अहवाल असणाऱ्या वॉरिअर्सवर
पुढील आठवड्यापासून कोव्हॅक्सिनच्या चाचणीला सुरुवात होणार आहे.
भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचणीसाठी देशात १२ सेंटरची निवड करण्यात आली आहे. यात नागपूरचे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश आहे. या मानवी चाचणीसाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली.
यातील १८ ते ५५ वयोगटातील ५० व्यक्तींची हॉस्पिटलने नोंदणी केली आहे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. गिल्लूरकर यांनी सांगितले, १०-१० व्यक्तींचे पाच गट तयार करण्यात आले आहेत. याच आठवड्यात त्यांची शारीरिक तपासणी केली जाईल. यात त्यांना २९ निकषांतून जावे लागणार आहे.
यात संबंधित व्यक्तीला दारूचे व्यसन नको, स्टेरॉईड घेणारा नको, लठ्ठपणा नको, कोविड रुग्णाच्या संपर्कातील नको, यकृत, मूत्रपिंड, हृदयाचा कुठलाही आजार नको, मधुमेह, एचआयव्हीचा संसर्ग, कॅन्सरचा रुग्ण नको आदी सर्व निकषांतून गेल्यावर त्यांची लेखी मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविले जातील. रक्ताची चाचणी समाधानकारक असल्यावरच मानवी चाचणीसाठी निवड केली जाईल. निवड झालेल्यांवर पुढील आठवड्यापासून चाचणीला सुरुवात होईल, असेही डॉ. गिल्लूरकर म्हणाले.