ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी ५० कोटी : सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 08:55 PM2019-06-06T20:55:46+5:302019-06-06T20:56:56+5:30
सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या आराखड्यातील सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या आराखड्यातील सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली.
मुंबईतील सह्याद्र्री अतिथीगृहात या विषयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मोठा ताजबागस्थित दर्ग्याच्या विकास आणि सौंदर्यीकरणासाठी १३२.४९ कोटी रुपयांचा आराखडा यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. अनेक कामे या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, मंजूर निधीपैकी ८२.३९ कोटी रुपयांचा निधी वितरित झाला आहे. आतापर्यंत ६७.५८ कोटी रुपयाच्या खर्चाची कामे पूर्ण झाली आहेत. १७.७१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. आराखड्यातील सुरू असलेल्या उर्वरित कामांसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. त्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. कम्पाऊंड वॉल, रस्ते विकास, दर्गा परिसरातील दुकानाचे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पुनर्वसन, स्वच्छतागृहांची व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन यासारखी अनेक कामे या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.