नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ५० कोटींचे स्पाईनल इन्जुरी व स्पोर्ट्स सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 01:22 PM2020-02-15T13:22:54+5:302020-02-15T13:35:38+5:30
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २५ कोटींची इमारत व २५ कोटींची यंत्रसामग्री असे मिळून ५० कोटींचे ‘स्पाईनल इन्जुरी व स्पोर्ट्स सेंटर’ उभे करणार आहे.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढते अपघात, जोखमीचे शारीरिक खेळ व आजारामुळे पाठीचा कण्याला इजा होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात बहुसंख्य जखमींवर उर्वरित आयुष्य खाटेवर किंवा व्हीलचेअरवर घालवावे लागते. याला गंभीरतेने घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २५ कोटींची इमारत व २५ कोटींची यंत्रसामग्री असे मिळून ५० कोटींचे ‘स्पाईनल इन्जुरी व स्पोर्ट्स सेंटर’ उभे करणार आहे.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्यायविभागाच्या पुढाकाराने नागपूरच्या मेडिकलमध्ये दोन वर्षांपूर्वी ‘स्टेट स्पाईनल इंज्युरी सेंटर’ उभारण्याला मंजुरी मिळाली होती. पाच कोटींच्या ‘सीएसआर’ निधीतून हे सेंटर उभे राहणार होते. या संदर्भातील प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. परंतु त्रुटी काढून वारंवार परत पाठविण्यात आला.
शिवाय, हे सेंटर केवळ १० खाटांचे होते. त्या तुलनेत रुग्णांची संख्या बरीच मोठी आहे. यामुळे हा प्रकल्प बाजूला ठेवत मेडिकल प्रशासनाने नव्या ‘स्पाईनल इन्जुरी व स्पोर्ट्स सेंटर’चा प्रस्ताव तयार केला आहे. येथे अद्ययावत उपचारासोबतच रुग्णांच्या पुनर्वसनाकडे लक्ष दिले गेले आहे.
६० खाटा, दोन शस्त्रक्रियागृह व अतिदक्षता विभाग
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा म्हणाले, जुन्या प्रस्तावात केवळ ‘स्पाईनल इन्जुरी सेंटर’ होते. नव्या प्रस्तावात ‘स्पोर्ट्स’ अंतर्भूत करण्यात आले आहे. यामुळे व्याप्ती वाढली आहे. ‘स्पाईन, स्पोर्ट्स इन्जुरी सेंटर’ हे ६० खाटांचे असेल. दोन शस्त्रक्रिया गृह व पाच खाटांचे अतिदक्षता विभाग असणार आहे. विशेष म्हणजे, सेंटरचा ४० टक्के भाग हा पुनर्वसनाचा असणार आहे. यामुळे रुग्णाला लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न असेल.
अद्ययावत तंत्रज्ञान
नव्या प्रस्तावित सेंटरमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘स्पाईनल सर्जरी’सह मणक्याची बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली जाईल. रेडिओफ्रिक्वेन्सी लहरी व लेझर या प्रगत-शास्त्रीय उपकरणांद्वारे कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता रुग्ण वेदनामुक्त शस्त्रक्रिया येथे होतील. एक्स-रे (सी-आर्म) वर सुईचे टोकाद्वारे मणक्यावर शस्त्रक्रिया होतील. हे सेंटर ‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या अगदी समोर उभारले जाणार आहे.