५० खतरनाक गुन्हेगार फरार

By admin | Published: July 3, 2017 02:22 AM2017-07-03T02:22:24+5:302017-07-03T02:22:24+5:30

कारागृहातून विशिष्ट कालावधीसाठी बाहेर आलेले कैदी पुन्हा शिक्षा भोगण्यास परत जाण्याचे टाळत आहेत.

50 dangerous criminals absconding | ५० खतरनाक गुन्हेगार फरार

५० खतरनाक गुन्हेगार फरार

Next

अभिवचन, संचित रजेवर कारागृहातून बाहेर : रजा संपताच शहरातून बेपत्ता
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारागृहातून विशिष्ट कालावधीसाठी बाहेर आलेले कैदी पुन्हा शिक्षा भोगण्यास परत जाण्याचे टाळत आहेत. ते कारागृहातून बाहेर येताच पळून जात आहे. गेल्या पाच दिवसात दोन कैदी पुन्हा फरार झाले असून, अशाप्रकारे फरार होणाऱ्या कैद्यांची दीड वर्षातील संख्या ५० वर पोहचली आहे. खतरनाक गुन्हेगारांच्या या पवित्र्यामुळे सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

समाजकंटक, खतरनाक गुन्हेगार मोकळे राहू नये म्हणून त्यांना कारागृहात डांबले जाते. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सद्यस्थितीत २२०० ते २४०० गुन्हेगार बंदिस्त आहेत. त्यातील ३० ते ४० टक्के कच्चे कैदी ( प्रकरण न्यायप्रविष्ट असलेले) आणि उर्वरित कैदी सिद्धदोष (शिक्षा सुनावण्यात आलेले) आहेत. विविध गुन्ह्यात कैद्यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांच्या गुन्ह्याच्या आणि शिक्षेच्या स्वरूपानुसार त्यांना वेगवेगळ्या बराकीत (कोठडीत) ठेवले जाते. कारागृहातील बंदिस्त जीवन, अर्थात् शिक्षा भोगल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हा करण्याची हिंमत करू नये, सामाजिक मर्यादेत राहून त्याने समाजात वावरावे, असा कारागृहातील शिक्षेचा उद्देश आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगार कारागृहात गेल्यानंतर तेथील ‘शिस्तबद्धपणा’मुळे सुतासारखे सरळ होतात.
ते पुन्हा गुन्हा करण्याची हिंमत दाखवत नाहीत.

मात्र, अनेक गुन्हेगार शिक्षा भोगून परत आल्यानंतरही गुन्हे करतात अन् वारंवार कारागृहात जातात. काहींना कारागृहाच्या जीवनाची सवय झालेली असते. त्यामुळे असे गुन्हेगार नेहमीच गुन्हेगारीत सक्रिय असतात. अनेकजण गुन्हे करताना कारागृहात जावे लागणार नाही, याचीही दक्षता घेतात. काही गुन्हेगार मात्र कारागृहातून रजेच्या नावाखाली बाहेर येतात अन् नंतर पळून जातात.
वर्षभरात मिळतात २८ रजा
एक वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर प्रत्येक कैद्याला २८ दिवसांची रजा उपभोगण्याचा अधिकार (अपवाद वगळता) आहे. त्याला संचित रजा म्हणतात. कैद्यांसाठी पुन्हा एका रजेचा मार्ग आहे. त्याला अभिवचन रजा म्हणतात. आकस्मिक कारणामुळे त्याला ती मिळू शकते. त्याला त्यासाठी कारागृहातील वरिष्ठ आणि विभागीय आयुक्तांची परवानगी आणि त्यांनी नकार दिल्यास कोर्टाची परवानगी मिळवावी लागते. गुन्हेगाराची वृत्ती लक्षात घेत कारागृहाचे अधिकारी, विभागीय आयुक्त ही रजा मंजूर / नामंजूर करतात. अनेकदा कैद्याची मानसिकता लक्षात घेऊन अधिकारी त्याला बाहेर जाऊ देण्यास नकार देतात. असे काही गुन्हेगार कोर्टातून आदेश मिळवतात. रजा मंजूर झाल्यास संबंधित कैद्याला तो ज्या भागात राहतो, त्या भागातील पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागते. रजा उपभोगल्यानंतर कैद्याने नमूद काळात कारागृहात परतणे आवश्यक आहे. मात्र, काही अट्टल गुन्हेगार रजेच्या शेवटच्या दिवशीच फरार होतात. तो नमूद तारखेला कारागृहात परतला नसल्याचे पाहून कारागृह अधिकारी संबंधित पोलिसांना तसे कळवितात. त्यानंतर तो गुन्हेगार फरार झाल्याचे उघड होते.

अभिवचन १४,
संचित रजेचे ३६ गुन्हेगार
गेल्या पाच दिवसांपूर्वी अशा प्रकारे अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना बाबुलखेडा भागात राहणारा सौरभ कडलग आणि केतन ऊर्फ चेतन अशोक शंभरकर (वय ३५, रा. न्यू बाबुळखेडा) हे दोन गुन्हेगार फरार झाले. या दोघांनाही विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याने संचित रजेसाठी अर्ज केला होता. त्यानुसार, त्याला २१ दिवसाची संचित रजा मंजूर करण्यात आली. २५ जूनला दुपारी १ वाजतापर्यंत कारागृहात परत जायचे होते. मात्र, ते दोघेही फरार झाले.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१६ ते ३० जून २०१७ या दीड वर्षांच्या कालावधीत अशा प्रकारे फरार झालेल्या खतरनाक गुन्हेगारांची संख्या ५० आहेत. त्यात अभिवचन रजेवर (पॅरोल) आलेल्या गुन्हेगारांची संख्या १४, तर, संचित रजेवर (फर्लो ) आलेल्या गुन्हेगारांची संख्या ३६ आहे.

Web Title: 50 dangerous criminals absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.