नागपुरात जीएसटी संकलनात ५० टक्के घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 10:39 PM2020-09-11T22:39:46+5:302020-09-11T22:40:57+5:30
कोरोना महामारीमुळे मार्चनंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कारखाने बंद झाले आणि त्याचा परिणाम मे महिन्यात दिसून आला. पण या काळात जीवनाश्यक वस्तूंचे उत्पादन सुरू असल्यानंतरही नागपूर झोनमध्ये जीएसटी संकलनात ५० टक्क्यांची घसरण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीमुळे मार्चनंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कारखाने बंद झाले आणि त्याचा परिणाम मे महिन्यात दिसून आला. पण या काळात जीवनाश्यक वस्तूंचे उत्पादन सुरू असल्यानंतरही नागपूर झोनमध्ये जीएसटी संकलनात ५० टक्क्यांची घसरण झाली.
तुलनात्मकरीत्या आकडेवारी पाहिल्यास आर्थिक वर्ष २०१९-२० च्या एप्रिल ते जून या तीन महिन्यात नागपूर झोनमध्ये ३५०१.०५ कोटींचा जीएसटी गोळा झाला होता. पण आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तीन महिन्यात १७४८.४५ कोटी जीएसटी गोळा झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी तीन महिन्यात १७५२.६० कोटी जीएसटी कमी जमा झाला. एप्रिल, मे आणि जून महिन्यात जीएसटीचे संकलन होणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पण त्यात ५० टक्के घसरण पाहायला मिळाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन अर्थात मंदीच्या काळातही जीएसटी संकलन चांगले झाले, असे म्हणता येईल. या काळात जीवनावश्यक वस्तू आणि सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे जीएसटी संकलनात जास्त घसरण झाली नाही. नागपूर झोनमध्ये आर्थिक वर्ष २०१९-२० ची जीएसटी संकलनाची आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक जीएसटी कोळसा उद्योगातून २२८२.१० कोटी, सिमेंट १२८२.१८ कोटी, वाहन २९४.२२ कोटी, आयसी इंजिन २८०.६३ कोटी, आयरन व स्टील ६२४.८२ कोटी, तंबाखू उद्योगाकडून ३०९.७१ कोटींचे संकलन झाले होते.
जून महिन्यात जीएसटी्र संकलनात सुधारणा झाली. जून २०२० मध्ये ९६०.६६ कोटी जीएसटी स्वरुपात मिळाले. त्यापूर्वीच्या वर्षात जूनमध्ये १०५४.३० कोटी रुपये विभागाला प्राप्त झाले होते. तुलनात्मकरीत्या यंदाच्या जूनमध्ये ८४.६४ कोटी अर्थात ८ टक्के कमी जीएसटी मिळाला. लॉकडाऊन हटल्यानंतर जूनमध्ये कारखाने सुरू झाल्याने जीएसटी संकलन वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या कोरोना महामारीमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग संकटात आहेत. त्या उद्योगांकडून जीएसटी कमी मिळतो. सर्वाधिक ६० ते ७० टक्के जीएसटी मोठ्या उद्योगातून मिळतो. या उद्योगांमध्ये सध्या उत्पादन वाढले आहे. नागपूर झोनमध्ये आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या तुलनेत वर्ष २०१९-२० मध्ये जीएसटीआर-३बी भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन ती ९,७४,९८६ पोहोचली. त्यापूर्वीच्या वर्षीच्या तुलनेत ७०,९९१ जास्त जीएसटीआर-३बी भरण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.