कट्टा ५० किग्रॅचा; धान्य ४५ किग्रॅ!
By Admin | Published: July 23, 2016 03:22 AM2016-07-23T03:22:11+5:302016-07-23T03:22:11+5:30
शासनाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहार योजना लागू केली. यात विद्यार्थ्यांना शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते.
शालेय पोषण आहार : क्विंटलमागे १० किलो धान्य कमी
शरद मिरे भिवापूर
शासनाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहार योजना लागू केली. यात विद्यार्थ्यांना शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते. यासाठी लागणाऱ्या धान्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी खासगी एजन्सीकडे सोपविण्यात आली. या एजन्सीमार्फत भिवापूर तालुक्यात पुरविण्यात आलेल्या धान्याच्या अर्थात तांदळाच्या वजनात तूट असल्याचे निदर्शनास आले आहे. तांदळाचा प्रत्येक कट्टा (पोती) ५० किलो वजनाचा असून, त्यात प्रत्यक्षात ४५ किलो तांदूळ असल्याचे आढळून आले. त्यामुळे क्विंटलमागे १० किलो धान्याचा कमी पुरवठा करून एक क्व्ािंटल धान्याची किंमत शासनाकडून वसूल केली जात आहे.
भिवापूर तालुक्यातील जवळी येथील जिल्हा परिषद विद्यालयात शुक्रवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. या शाळेची पटसंख्या १९८ आहे. शाळेतील शालेय पोषण आहार धान्याचा साठा संपत आल्याने शाळा व्यवस्थापनाने संबंधितांकडे ९९८ किलो धान्याची मागणी नोंदविली. त्यानुसार एजन्सीने शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास या शाळेला धान्याचा पुरवठा केला. सदर धान्य एमएच-३१/एम-५१९८ क्रमांकाच्या वाहनाने शाळेच्या आवारात आणण्यात आले.
सदर धान्याचे कट्टे शाळेत उतरविण्यात आले. दरम्यान, शाळेतील कर्मचाऱ्याला या ५० किलोच्या कट्ट्याच्या वजनाविषयी संशय आल्याने त्याने वाहनासोबत आलेल्या एजन्सीच्या व्यक्तीला सदर धान्य मोजून देण्याची विनंती केली.
या कट्ट्याचे वजन केले असता, प्रत्येक कट्ट्यात चार ते पाच किलो धान्य कमी असल्याचे निदर्शनास आले. एकूण २० कट्ट्यांमध्ये एक क्व्ािंटल धान्य कमी असल्याचे आढळून आले. प्रत्येक महिन्याला या शाळेसोबत तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेला एजन्सीमार्फत धान्याचा पुरवठा केला जातो. प्रत्येक वेळी कुणीही धान्याचे वजन करण्याच्या भरीस पडले नाही. त्यामुळे कमी धान्याचा पुरवठा करीत शासनाला लाखो रुपयांनी चुना लावल्याची शक्यता नाकारता येत नाही.
महिन्याला लाखो रुपयांचा घोटाळा
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १०७ प्राथमिक आणि दोन माध्यमिक शाळा आहेत. शिवाय, खासगी शाळांची संख्याही बरीच मोठी आहे. या सर्व शाळांना शिक्षण विभागामार्फत एजन्सीद्वारे नियमित धान्यपुरवठा केला जातो. प्रत्येक शाळेत तांदळाचे ५० किलो वजनाचे कट्टे दिले जातात. जेवढी मागणी त्याप्रमाणे शाळेला तांदळाचे कट्टे पुरविले जातात. सदर कट्टे सीलबंद राहात असल्याने त्यांच्या वजनाविषयी कुणीही अविश्वास व्यक्त करीत नाही. ही बाब एजन्सीच्या पथ्यावर पडणारी आहे. दुसरीकडे कोणत्याही शाळेत कधीच धान्य स्वीकारताना वजन केले जात नाही. जवळी शाळेतील प्रकार अन्य शाळांच्या बाबतीत घडू शकतो. या व्यवहारात लाखो रुपयांचा घोळ केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधीक्षकांकडे तक्रार
आम्ही नेहमीच धान्य मोजमाप केल्यानंतर स्वीकारतो. धान्य कमी आढळल्यास ते एजन्सीच्या संबंधित व्यक्तीला परत करतो. शुक्रवारी धान्य कमी असल्याचे आढळून आले. याबाबत शालेय पोषण आहार अधीक्षकांकडे लगेच तक्रार केली.
- आर. डब्ल्यू. लामगे, शिक्षक
एजन्सीसोबत संपर्क नाही
या प्रकाराबाबत माहिती मिळाली. पोषण आहार वितरणाचे काम जिल्हास्तरावरून होते. त्यामुळे आमच्याशी एजन्सीचा फारसा संपर्क येत नाही. या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात येईल. शिवाय, प्रत्येक शाळांनी धान्य मोजमाप करून घ्यावे.
- प्रभाकर मेहरे, गट शिक्षणाधिकारी, भिवापूर.