कुलगुरू सुभाष चौधरी यांच्याविरुद्ध ५० लाख रूपये भरपाईचा दावा

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: December 11, 2023 09:21 PM2023-12-11T21:21:07+5:302023-12-11T21:22:03+5:30

निवृत्त प्रा. मोहन काशीकर यांची दिवाणी न्यायालयात धाव

50 lakh compensation claim against vice chancellor subhash chaudhary | कुलगुरू सुभाष चौधरी यांच्याविरुद्ध ५० लाख रूपये भरपाईचा दावा

कुलगुरू सुभाष चौधरी यांच्याविरुद्ध ५० लाख रूपये भरपाईचा दावा

राकेश घानोडे, नागपूर : पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख पदी कार्यरत असताना अवैध कारवाई करण्यात आल्यामुळे व्यथित झालेले निवृत्त प्रा. मोहन काशीकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याविरुद्ध वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयामध्ये ५० लाख रुपये भरपाईचा दावा दाखल केला आहे. न्यायालयाने चौधरी यांना यावर उत्तर दाखल करण्याचा आदेश देऊन प्रकरणावर येत्या १८ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख पदी कार्यरत असताना काशीकर यांच्याकडे ९ सप्टेंबर २०२० रोजी मानव्य विद्याशाखेच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला होता. परंतु, काशिकर यांनी वैयक्तिक कारणांमुळे ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर चौधरी यांनी ३१ जुलै २०२१ रोजी इतिहास विभागातील प्रा. श्यामराव कोरेटी यांची पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाचे प्रभारी प्रमुख म्हणून नियुक्ती केली. तसेच, ३ ऑगस्ट २०२१ रोजी काशीकर यांच्याविरुद्ध गैरवर्तणूकीचे आरोप निश्चित करून विभागीय चौकशीचे निर्देश दिले.

त्याविरुद्ध काशीकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता ऑक्टोबर-२०२२ मध्ये वादग्रस्त कारवाई अवैध ठरवून रद्द केली गेली. परंतु, संबंधित कारवाईमुळे अप्रतिष्ठा झाली. निष्कलंक प्रतिमेचे हनन झाले. शारीरिक-मानसिक त्रास झाला. आर्थिक नुकसान सहन करावे लागले. भविष्यातील अनेक व्यावसायिक संधींना मुकावे लागले. करिता, चौधरी यांच्याकडून ५० लाख रूपये भरपाई मिळवून द्यावी, असे काशीकर यांचे म्हणणे आहे. काशीकर यांच्यातर्फे ॲड. मकरंद राजकोंडावार यांनी कामकाज पाहिले.

Web Title: 50 lakh compensation claim against vice chancellor subhash chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.