नागपुरात बंदमुळे एसटीला ५० लाखाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:42 PM2018-09-10T22:42:23+5:302018-09-10T22:43:10+5:30
कॉंग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील ८० टक्के बसेस ठप्प झाल्या. एकूण १०१६ बसफेऱ्या रद्द करण्याची पाळी एसटी महामंडळावर आली. यामुळे नागपूर विभागात एसटी महामंडळाला तब्बल ५० लाखांचा फटका बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉंग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील ८० टक्के बसेस ठप्प झाल्या. एकूण १०१६ बसफेऱ्या रद्द करण्याची पाळी एसटी महामंडळावर आली. यामुळे नागपूर विभागात एसटी महामंडळाला तब्बल ५० लाखांचा फटका बसला.
सोमवारी बंदमुळे एसटी महामंडळाच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. बंदची आधीच माहिती असल्यामुळे बहुतांश प्रवाशांनी प्रवासाचा बेत रद्द केला होता. तर बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना बसेस बंद असल्याचे समजल्यामुळे आल्यापावली परत जाण्याची पाळी आली. सकाळी ६ ते दुपारी ४ दरम्यान एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण ११५० बसेस सोडण्यात येतात. परंतु या कालावधीत केवळ १३४ बसेस आगाराबाहेर गेल्या. तर १०१६ बसफेऱ्या रद्द करण्याची पाळी एसटी महामंडळावर आली. बंददरम्यान अनेकदा एसटी बसेसची तोडफोड करण्यात येते. त्यामुळे बसेस बंद ठेवण्याचा निर्णय एसटीच्या अधिकाऱ्यांनी घेतला. दुपारी ४ पर्यंत एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला बंदमुळे ५० लाखाचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. बंदमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांना खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळावे लागले. सायंकाळी ५ वाजता एसटी महामंडळाने आपल्या बसेस वाहतुकीसाठी सोडणे सुरू केल्यामुळे प्रवाशांनी बसस्थानकाकडे धाव घेतल्याचे चित्र होते.
बसेसची तोडफोड नाही
‘बंदमुळे विभागात ११५० पैकी केवळ १३४ बसेस बाहेर पडल्या. त्यानंतर बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु एसटीच्या एकाही बसची तोडफोड नागपूर विभागात झाली नाही.’
अशोक वरठे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग