नागपूर जिल्ह्यातील ५० अर्धवेळ ग्रंथपाल झाले पूर्णवेळ, माध्यमिक शिक्षण विभागाकडून आदेश निर्गमीत
By गणेश हुड | Published: March 1, 2024 07:40 PM2024-03-01T19:40:18+5:302024-03-01T19:40:32+5:30
शासन निर्णयानुसार इयत्ता ६ ते १२ च्या विद्यार्थी पटसंख्या एक हजारावर असणाऱ्या शाळांना पूर्णवेळ ग्रंथपालाचे पद मंजूर असते.
नागपूर : राज्यातील अर्धवेळ ग्रंथपाल कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ ग्रंथपाल करण्याबाबत शासन आदेश होते. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील ६४ अर्धवेळ ग्रंथपालांपैकी ५० अर्धवेळ ग्रंथपालांचे उन्नयन करण्याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने काढले आहेत.
शासन निर्णयानुसार इयत्ता ६ ते १२ च्या विद्यार्थी पटसंख्या एक हजारावर असणाऱ्या शाळांना पूर्णवेळ ग्रंथपालाचे पद मंजूर असते. परंतु नागपूर जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये एक हजार विद्यार्थी पटसंख्या नाही. अशा शाळांत अर्धवेळ ग्रंथपाल पदावर कार्यरत होते. परंतु शासन निर्णय १३ एप्रिल २०२३ नुसार मॅपिंग पध्दतीने दोन ते तीन शाळा एकत्रिकरून पटसंख्या एक हजार असेल, तसेच ज्यांची सेवा अर्धवेळ ग्रंथपाल पदावर पूर्ण झाली अशा अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर मान्यता देण्यात आली आहे.
एकत्रित केलेल्या शाळांमध्ये आठवड्यातील दोन ते तीन दिवस टप्प्या टप्प्याने समाविष्ठ करण्यात आलेल्या शाळांमध्ये कार्यरत राहून ग्रंथपाल पदाची सेवा प्रदान करावी लागणार आहे. पूर्णवेळ पदावर उन्नयन झालेल्या ग्रंथपालांचे वेतन व लाभ १३ एप्रिल २०२३ पासून अनुज्ञेय राहणार आहे. तसेच २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या ग्रंथपालांना तसेच संबंधित शाळा २००५ पूर्वी शंभर टक्के अनुदानित शाळा असल्यास नियमानूसार जुन्या पेंशन योजनेचा लाभही मिळणार आहे. शुक्रवारला माध्यमिक शिक्षण विभागाच्या लगतच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये या ग्रंथपालांना नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आले. यावेळी शिक्षण विभागातील अधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.