रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे भरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2016 03:13 AM2016-02-29T03:13:46+5:302016-02-29T03:13:46+5:30

मोटार वाहन विभाग हा राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा महत्त्वपूर्ण विभाग आहे.

50 percent of the vacant posts will be filled! | रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे भरणार!

रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे भरणार!

Next

मुख्यमंत्री फडणवीस : मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन
नागपूर : मोटार वाहन विभाग हा राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा महत्त्वपूर्ण विभाग आहे. या विभागात रिक्त असलेल्या पदांपैकी ५० टक्के पदे भरण्याची सूचना या आधीच दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी, भत्ते वाढ करून देण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे. या विभागाने शासनाच्या महसुलात वाढ केल्यास त्याची ‘मेरिट केस’ बनवून मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
उत्तर अंबाझरी मार्गावरील महाराणा प्रताप सभागृहात मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजित १३ व्या राज्यस्तरीय कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस सुनील जोशी, राज्य परिवहन आयुक्त श्याम वर्धने, प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर ग्रामीण) शरद जिचकार, नगरसेवक परिणय फुके, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अशोक थुल, मध्यवर्ती संघटना नागपूर विभागाचे अध्यक्ष चंद्रहास सुटे, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष नारायण समर्थ, चिटणीस दशरथ घोडमारे, सुरेंद्र सरतापे, प्रशांत मांडवेकर व अनिल तांबडे उपस्थित होते. दरम्यान नारायण समर्थ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विभागाच्या ‘संवाद’ या स्मरणिकेचे विमोचनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक समर्थ यांनी केले. संचालन रेखा घिया (दंडिगे) यांनी केले. आभार प्रदीप लेहगावकर यांनी मानले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

लोकशाहीचे मालक नव्हे सेवक व्हा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना सेवा देणारा हा विभाग आहे. त्याचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणही झाले पाहिजे. नागरिकांना उत्तम, कार्यक्षम सेवा हवी असते. यामुळे मालक नव्हे, सेवक व्हा असे आवाहन करीत विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी गतिमानता आवश्यक असल्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नवीन तंत्रज्ञान व लोकांना जास्तीतजास्त आणि पारदर्शी सेवा देण्यासाठीही प्रयत्न केला जाणार असल्याचे ते म्हणाले. विभागातील रिक्त पदे भरल्यास शासनाला या विभागाकडून तीन ते चार हजार कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो, असे राज्य परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पदभरतीसंदर्भात शासन सकारात्मक विचार करत असल्याचेही ते म्हणाले.

आपल्यापेक्षा बाजूच्या नाक्याचा महसूल मोठा
शेजारच्या नाक्यांमधूनच आपल्या नाक्यावर वाहने येतात. असे असताना दोघांचा महसूल सारखाच असणे आवश्यक आहे, परंतु आपल्यापेक्षा बाजूच्या नाक्याचा महसूल मोठा आहे. ही गंभीर बाब आहे. तो वाढविण्याचा प्रयत्न करावा तसेच विविध नाक्यांसंदर्भात नागरिकांकडून तक्रारी येतात. त्या कशा कमी करता येतील, याचाही विचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

आश्वासनांचा पाठपुरावा करा
सुनील जोशी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्त पदे, वेतनश्रेणी आणि भत्ते वाढ यावर आश्वासन दिले असले तरी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. संघटनेला मजबूत करा, असे आवाहन करीत त्यांनी लिपीक म्हणून लागलेला कर्मचारी वर्ग दोनचे अधिकारी होऊनच सेवानिवृत्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी संघटना आपल्या सोबत राहील, अशीही ग्वाही दिली.

Web Title: 50 percent of the vacant posts will be filled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.