पोलीस आयुक्तालयाची पन्नाशी
By admin | Published: July 11, 2016 02:32 AM2016-07-11T02:32:43+5:302016-07-11T02:32:43+5:30
गुन्हेगारीचे बदलते स्वरूप आणि तपासाचा हायटेक बदल अनुभवणाऱ्या नागपूर पोलीस आयुक्तालयाने १ जुलैला ५१ वर्षे पूर्ण केली आहे.
अनेक स्थित्यंतरे : प्रेरणादायी आठवणींचा ठेवा होतोय एकत्र
नरेश डोंगरे नागपूर
गुन्हेगारीचे बदलते स्वरूप आणि तपासाचा हायटेक बदल अनुभवणाऱ्या नागपूर पोलीस आयुक्तालयाने १ जुलैला ५१ वर्षे पूर्ण केली आहे. या प्रदीर्घ कालावधीत कर्तव्याची वाटचाल करणाऱ्या शहर पोलीस दलाने पुढील अधिकाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी ठरतील अशा आठवणीतील काही स्मृती एकत्रित करण्यासाठी धडपड चालवली आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या काही चमू भूतकाळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचे संकलन करण्यासाठी कामी लागल्या आहेत.
विदर्भासह मध्य प्रदेश प्रांताचा काही भाग सीपी अॅन्ड बेरार प्रांतात होता. १९६० ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी नागपूरसह विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला. दरम्यान, देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरची लोकसंख्या आणि गुन्हेगारी लक्षात घेत तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने नागपूरला पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रशासकीय औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर १ जुलै १९६५ ला नागपुरात पोलीस आयुक्तालय सुरू झाले. श्री. मुगवे नामक अधिकाऱ्यांनी त्यावेळी नागपूरचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्यावेळी नागपुरात १० पोलीस ठाणी आणि तीन झोन होते.
सुमारे ६० ते ७० अधिकारी आणि ६०० ते ७०० पोलीस कर्मचाऱ्यांचे संख्याबळ होते. मोजकी वाहने आणि टेलिफोन (काही ठिकाणीच) सारख्या सुविधांवर नागपूर पोलिसांचा कारभार सुरू झाला. लोकसंख्येसोबतच १९७५ पासून गुन्हेगारीतही मोठी वाढ झाली. १९९२ नंतर शहरातील गुन्हेगारीचे स्वरूप बदलले.
३३ व्या आयुक्तांच्या गुन्हेगारी नियंत्रणाच्या कल्पना
उपराजधानीतील लोकसंख्या अन् गुन्हेगारांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. बदल्यात पोलिसांचे संख्याबळ वाढले असून, आयुक्तालयाचाही विस्तार झाला आहे. पाच परिमंडळ, २८ पोलीस ठाणी उपराजधानीच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यासाठी पोलीस आयुक्त, सहआयुक्त, दोन अतिरिक्त आयुक्त, नऊ उपायुक्त, उपनिरीक्षकांपासून तो सहायक आयुक्तांपर्यंत एक हजार अधिकारी तसेच आठ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कर्तव्यावर आहे. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव हे उपराजधानीचे ३३ वे पोलीस आयुक्त आहेत. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाटचालीबाबत लोकमतशी चर्चा करताना गुन्हेगारी नियंत्रणाच्या अनेक कल्पना आयुक्त यादव यांनी मांडल्या. आयुक्तालयाच्या नव्या इमारतीच्या निर्मितीची कागदोपत्री पूर्तता झाली आहे. सध्याच्या आयुक्तालयाशेजारीच नवीन प्रशस्त इमारत बांधली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन भूमिपूजन समारंभ आणि त्याच कार्यक्रमात शहर पोलिसांच्या ‘गोल्डन ज्युबिली इनिंग‘च्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.