आरटीईच्या प्रतिपुर्तीत ५० टक्के कपात, पालकांकडून मात्र १०० टक्के फी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:07 AM2021-06-23T04:07:45+5:302021-06-23T04:07:45+5:30
नागपूर : राज्य सरकारने आरटीई अंतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या प्रतिपूर्तीत ५० टक्केची घट केली आहे. मग पालकांकडून १०० टक्के ...
नागपूर : राज्य सरकारने आरटीई अंतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या प्रतिपूर्तीत ५० टक्केची घट केली आहे. मग पालकांकडून १०० टक्के फी वसुली का, असा सवाल पालकांनी राज्य सरकारकडे केला आहे. शाळा जर ऑनलाईन असेल तर आम्हालाही फीमध्ये ५० टक्के सूट द्यावी, अशी मागणी पालक संघटनांनी पत्रपरिषदेतून सरकारकडे केली .
गेल्या वर्षभरापासून पालक व शाळा व्यवस्थापनात स्कूल फी वरून सातत्याने वाद सुरू आहे. प्रशासन पालकांचे समाधान करू शकले नाही. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन शाळांकडून होत नाही. शाळांनी ‘पीटीए’ चा गैरवापर केला आहे. सर्व शाळा चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत नोंदणीकृत असल्याने शाळांनी आपले फायनान्शियल ऑडिट सादर करणे गरजेचे आहे. शाळांची मनमानी सुरू असून, फी न भरू शकलेल्या पालकांच्या पाल्यांच्या टीसी शाळेने घरी पाठविले आहे. न्यायालयाचे निर्देश शाळा पाळत नाही, सीबीएसईच्या गाईडलाईन पाळत नाही. राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाकडे पाठ दाखविली जाते, असे असताना अधिकारी कारवाई करीत नाही. त्यामुळे पालक संघटना आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. पत्रपरिषदेला पंकज गुल्हाने, अजय चालखुरे, अमित होशिंग, अॅड. पवन सहारे, अभिषेक जैन, संदीप अग्रवाल, संजय शर्मा, गिरीश पांडे आदी उपस्थित होते.